Sunday, February 5, 2023

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या दरम्यान शिवसेना आणि अकाली दल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले होते. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करणे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आवश्यक आहे. मंत्री पदासाठी नारायण राणे, पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. महाराष्ट्रातून प्रीतम किंवा पंकजा मुंडे यांच्यापैकी एका नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खलबते चालू केली आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील काही बैठकांमध्ये सामील झाले होते. या मंत्रिमंडळात 24 नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात कोणा-कोणाचा समावेश केला जाणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार काय? आणि जर मिळाले तर कोणते खाते दिले जाणार, याचे औत्सुक्य वाढले आहे.फडणवीस यांच्याकडे ऊर्जा किंवा रेल्वे खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते असे सूत्रांकडून समजत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन काही वरीष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यामुळे आता फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाच्या चर्चेला जोर धरू लागली आहे. भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्यास सांगितले तर मला आनंदच होईल, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. तसेच पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनास पुढील पंधरवड्यात सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदरच मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.