मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारत मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यावर पूर्णविराम लागला. आंबेडकर यांनी खुद्द सोमवारी (9 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत काँग्रेससोबत युती करणार नसल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला.
घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “काँग्रेसच्या वागणुकीत अजून कुठलाही बदल झालेला नाही. काँग्रेस अजूनही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भूमिका घेत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांशीही आम्ही बोललो. त्यातून कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा राहिलेली नाही.”
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला. मात्र, त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. विधानसभा निवडणुकीला वेळ फार कमी आहे. त्यामुळे आता आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून ‘आता आम्ही युतीच्या भानगडीत न अडकता आमची वाटचाल सुरू केली आहे. गणपती विसर्जनानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत,’ यापुढे जे कुणी येतील त्यांना सोबत घेऊ.” अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. निवडणूक वेळापत्रक लक्षात घेता आम्हाला प्रचारासाठीही वेळ हवा आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
आम्ही एकमेकांना जागांची यादी दिली आहे. त्यामुळे दुसरे काय बोलतात, यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. या चर्चेत अडथळा येऊ नये, एवढीच दक्षता आम्ही घेत आहोत. “एमआयएमसोबत युतीसाठी बोलणी सुरू आहे. या युतीसाठी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत वाट पाहणार आहे. ओवेसी यांच्यासोबत पुण्यात भेट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या युतीबाबत मी आशावादी आहे.” आम्ही त्यांची शेवट्पर्यंत वाट बघणार आहोत, असेही ते म्हणाले. तसंच कोल्हापूर, सांगलीतल्या पुराकडे ज्याप्रमाणे सरकारने दुर्लक्ष केलं तसं पूर्व विदर्भातल्या पुराकडेही होतं असल्याचंही ते म्हणाले.