‘हॅलो कृषी’ या शेतीविषयक वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा राजू शेट्टींच्या हस्ते संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतीविषयक प्रश्नांच्या बातमीदारीसाठी ‘हॅलो कृषी’ या नवीन वेबपोर्टलचं लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या लोकार्पण सोहळ्याला डेलीहंट माध्यम समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र मुंजाळ यांचीही उपस्थिती होती. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं काय? या विषयावर राजू शेट्टी यांनी उपस्थितांना फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन केलं.

लोकसभेत आणि राज्यसभेत पारित झालेल्या कृषी विधेयकांवर राजू शेट्टींनी कडाडून टीका केली. आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कोणताच पर्याय भारतात यशस्वी झालेला नसून शेतीक्षेत्र बड्या उद्योगपतींच्या अधीन करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचं शेट्टी पुढे म्हणाले. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर न देण्याचं खाजगी विधेयक २०१८ साली मांडलं होतं, त्याला देशभरातील २६० कृषी संघटनांनी पाठिंबा दिला होता. हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्याची तरतूदही या विधेयकात होती, मात्र हे विधेयक मंजूर झालं नाही. याचा दाखला देत शेतकऱ्यांना किमान हमीभाव देता येत नसेल तर शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारायला हवाच अशी स्पष्ट भूमिका शेट्टींनी यावेळी मांडली.

https://www.facebook.com/hellokrushi/videos/617177465646367/

पोर्टलचं लोकार्पण करत असताना शेतकऱ्यांची मुलं करत असलेल्या धडपडीविषयी राजू शेट्टींनी आनंद व्यक्त केला. देशातील ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आपला दबावगट निर्माण करण्याची गरजही राजू शेट्टींनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलून दाखवली. ‘हॅलो कृषी’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून शेतीविषयक प्रश्नांची मांडणी करण्यात येणार असून या संदर्भात कुणीही योगदान देण्यास इच्छुक असेल तर 8806336033 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन हॅलो महाराष्ट्रचे प्रमुख आदर्श पाटील यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment