हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावर राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ता रविकांत वरपे यांनी कदमांवर निशाणा साधला आहे. “रामदास कदमांचे आदरणीय पवार साहेब व अजित पवार यांच्यावरील शिवसेना फोडीचे आरोप बेछूट आहेत. कदमांकडे दुसरे कारण नसल्याने ते राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जात आहेत. पण आदरणीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत,” असे प्रत्युत्तर वरपे यांनी कदमांच्या टीकेला दिले आहे.
रविकांत वरपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, रामदास कदमांकडून पवार साहेबांवर आरोप केले जात आहेत. मात्र, शिंदेच्या मागे जी शक्ती उभी आहे. त्या शक्तीनेच शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडली असून उद्या त्याच शक्तीपुढे कदम लोटांगण घालणार आहेत. कदमांकडे दुसरे कारण नसल्याने ते राष्ट्रवादीवर टीका करत आहेत.
रामदास कदमांचे आदरणीय पवार साहेब व अजितदादांवरील शिवसेना फोडीचे आरोप बेछूट असून शिंदेच्या मागे जी उभा असणाऱ्या शक्तीनेच शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडली असून उद्या त्याच शक्ती पुढे तुम्ही लोटांगण घालणार आहात. तुमच्याकडे दुसरे कारण नसल्याने तुम्ही राष्ट्रवादीवर टीका करत आहात. pic.twitter.com/Tv7ymFNp6B
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) July 19, 2022
रामदास कदम काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना शरद पवारांचा डाव कळला नाही. शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली. उद्धव साहेब आजारी असल्याने घरीच होते, त्यातच अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला,”असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.