हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संस्कृतीत सुवासिनी स्त्रीच्या दागिन्यांना विशेष महत्व असल्याचे म्हंटले जाते. आता गुवाहाटी न्यायालयाने जर एखादी महिला बांगड्या घालण्यास आणि कुंकू लावण्यास नकार देत असेल तर याचा अर्थ त्या महिलेला विवाह मंजूर नाही असे म्हंटले आहे. न्यायमूर्ती अजय लांबा आणि सौमित्र सैकिया यांच्या खंडपीठासमोर एका घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने असे मत नोंदवले आहे. न्यायालयाने या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी देताना जर अशा परिस्थितीत पतीला पत्नीसोबत एकत्र राहण्याची जबरदस्ती केली तर हे त्याचं शोषण मानलं जाऊ शकतं असा निष्कर्ष नोंदवला आहे. न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं की, “पत्नी जर बांगड्या आणि कुंकू वापरत नसेल तर ती अविवाहित असल्याचं दर्शवते किंवा याचा अर्थ तिला विवाह मंजूर नाही असा होतो. पत्नीचं असं वागणं तिला वैवाहिक आयुष्य पुढे नेण्यात काही रस नसल्याचं दाखवतं” ही याचिका आधी कौटुंबिक न्यायालयात फेटाळण्यात आली होती. मात्र पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
२०१२ मध्ये या दांपत्याचं लग्न झालं होतं. पतीने याचिकेत “लग्नानंतर एका महिन्यातच पत्नीने कुटुंबापासून वेगळं राहण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मी नकार दिल्यानंतर रोज भांडणं होऊ लागली. ३० जूनपासून आपण आणि पत्नी वेगळे राहत आहोत”. असे लिहिल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या पत्नीने तिच्यावर व तिच्या कुटुंबावर अत्याचार केल्याची केस घातली होती मात्र हे आरोप खोटे असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याचे देखील पतीने यावेळी सांगितले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.