हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जाऊ लागली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये कशा प्रकारे फूट पडेल याबाबत प्रयत्न केले जात आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे दोघे नेहमी राजकारण करायला पुढे असतात. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी एकदा तरी केंद्र सरकारला पत्र लिहिलं का? असा सवाल पवार यांनी विचारला आहे.
रोहित पवार यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील याच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यात राजकारण करायला फडणवीस आणि पाटील नेहमी पुढे येत असतात. मात्र, राज्यातील एखादा प्रश्न असेल तर त्याबाबत केंद्रात मात्र, एखादे साधे पत्रही यांच्याकडून लिहले जात नाही.
राज्यात जेव्हा अतिवृष्टी झाली, महापूर आला तेव्हा आपत्ती काळात आपत्ती व्यवस्थापन निधी हवा होता. त्यावेळी केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापन निधी सोडा साधे महाराष्ट्राला कर्मचारीही दिले गेले नाहीत. आणि राज्यातील भाजप नेत्यांनी या काळात एखादे पत्र तरी मदतीआठी केंद्र सरकारला लिहले का? असा सवाल पवार यांनी विचारला.
पडळकरांना दुसरे काय येते?
राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून टीका केली जात असल्याने याचा रोहित पवारांनी समाचार घेतला. यावेळी पवार म्हणाले की, पडळकरांना साधी आपली खानापूर नगर पंचायत राखता आली नाही. या ठिकाणी भाजपचा भोपळाही फुटला नाही. भाजपने काही कुटुंबावर बोलण्यासाठीच त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व दिले आहे. कारण, मोठे नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकत नाहीत. त्यांचे काम फक्त बोलण्याचेच आहे. पडलकरांना याशिवाय दुसरे काय येते, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.