भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र येणार ! ; संजय राऊतांचं मोठं विधान 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुक आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे  सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. गोव्यात शिवेसना आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली असली तरी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.  पुढल्या वाटचालीत हे दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील, असे राऊत यांनी म्हंटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज गोव्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या बाबतीत सांगायचे झाले तर राज्यात कुणीही स्वबळाचा नारा दिला नाही. महाविकास आघाडी सरकारमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थेत काही ठिकाणी वेगळे लढलो. कारण तळागाळातील कार्यकर्त्यांचा तो निर्णय होता. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नगरपंचायतीच्या निकालाकडे पाहत आहोत. राज्यात एकत्र सरकार चालवताना एकमेकांचं बोट धरुन चालत आहोत, त्यामुळे तसंच पाहावं लागेल.

राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे असे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. मात्र, भाजप हा क्रमांक एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजपा पहिल्या क्रमांकावर असून नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचे स्थान कायम ठेवल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढच राहा अशा मी शुभेच्छा देतो, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.