ईडी, सीबीआय भाजपची चिलखते, ती काढून समोर या, आम्हीही लढायला तयार – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संवाद साधत भाजपवर हल्लाबोल केला. यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “आमची आम्हाला ताकद माहिती आहे. आमचा आत्मविश्वास हाच आम्हाला पुढे घेऊन जातो. आमच्याशी लढाल तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. ईडी, सीबीआय हि भाजपची चलखतं आहेत. हिंमत असेल तर ती काढून मैदानात यावे. नाही लोळवले तर नाव सांगणार नाही. ईडी, सीबीय काहीही असो आम्ही लढायला आणि मरायला तयार आहोत,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल शिवसेना प्रमुख यांनी म्हंटले कि दिल्ली काबीज करायची आहे. आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक राज्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये काम झालं की नेत्याला फेकून दिलं जाते. राजकारणात गरज संपली की दूर केलं जाते. लक्ष्मीकांत पारसेकर, पर्रिकर, एकनाथ खडसे यांचं काय झाले? मुंडे परिवारासोबत काय झालं. संपूर्ण देशात भाजपत असंच केलं जातं.

भाजपसोबत आम्ही 25 वर्षे काढली. बाबरीनंतर उत्तर भारतात आमची लहर होती. याच काळात आम्ही उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब तसेच जम्मूपर्यंत आम्ही लढलो असतो तर आमचा पंतप्रधान असता. बाळासाहेब ठाकरे यांचे मन मोठे होते. देशात एक हिंदुत्वावादी पक्ष वाढत असेल तर ठीक आहे, असे बाळासाहेब यांचा विचार होता, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले.