हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्या रिदा रशिदा यांच्यासह तीन जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाडांवर आरोप करणाऱ्या महिलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
याबाबत शिवा भिष्माचार्य जगताप यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली असून त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, छटपूजेच्या दिवशी मुंब्र्यातील मुंब्रेश्वर मंदिर परिसरात तलावाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत माझे मित्रंही होते.
त्यावेळी रिदा रशिदा, सिंदर मुमताज अहमद आणि इतर दोन – तीन महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या. मी दलित असल्याचं रिदा यांना माहीत आहे. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून मला धक्काबुक्की केली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नव्या पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी रिदा रशिद, सिंकदर मुमताज, अहमद खान यांनी मला कार्यक्रमात पाहिले आणि जाणूनबुजून माझ्या बाजूने येऊन उभे राहिले. यावेळी हे लोक माझ्याकडे रागाने बघत होते. तसेच मला छटपूजेच्या दिवशीच्या प्रकरणावरून जातीवाचक शिवीगाळ देण्यास सुरुवात केली, असा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.