हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांतून तयारी केली जाऊ लागली आहे. विरोधी महाविकास आघाडी पक्ष आगामी निवडणूक एकत्रित लढतील का? असा प्रश्न उपस्थित झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आगामी निवडणुकीची एकत्रित तयारी करणार आहे, असे विधान पवार यांनी केले आहे. तसेच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला आहे. “सत्ता असलेल्यांनी जमिनीवर पाय ठेवावेत,” अशी टीका पवारांनी केली आहे
शरद पवार यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात काही नेत्यांकडून टीका करताना एकेरी उल्लेख केला जात आहे. यात टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली ठीक आहे. मात्र, राज्यात सत्ता हाती आल्यानंतर जमिनीवर पाय ठेऊन वागायचं असत. मात्र, मी अलीकडे पाहतोय कि ज्याच्याहाती सत्ता आहे ते जमिनीवर पाय ठेऊन काम करत नाहीत. सीमाप्रश्नी राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीची बैठक घेणे आवश्यक आहे.
आगामी निवडणूकीची तयारी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट एकत्रित करणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा महाराष्ट्रापुरता प्रयत्न आहे. त्यामध्ये इतर गटांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. रिपब्लिकन पक्षातील काही गटांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी सध्या सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. आणि ती व्यवस्थित त्या ठिकाणी मांडावी यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी सुद्धा दोन ते तीनवेळा बैठक घेण्यात आल्या आहेत. काही लोक तुरुंगात टाकणार असं म्हणत आहेत. काही लोक जामीन रद्द करू असा इशारा देत आहेत. ही राजकीय नेत्यांची कामे नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे. हे योग्य नसल्याचे पवारांनी यावेळी म्हंटले.
राज्यपालांकडून प्रतिष्ठा राखली गेली नाही : पवार
यावेळी शरद पवार यांनी राज्यपालाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपाल कोणत्याही पक्षाचे असो, पण आजवरच्या राज्यपालांनी राज्याच्या हिताचं काम केले, घटनेचं पालन केले पण हे पहिले राज्यपाल पहायला मिळतायत कि त्याच्याबद्दल खूप काही चर्चा होते. सतत लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. लोक त्यांच्यावर नापसंती व्यक्त करत आहेत. वास्तविक पाहता राज्यपाल हे महत्त्वाचे पद आहे. त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. पण ती यांच्याकडून राखली जात नाही, अशी टीका पवारांनी केली.