हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल’, असं आव्हान महाविकास आघाडी सरकारला केलं होत. फडणवीसांच्या या आव्हानाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चोख उत्तर देत खुलं आव्हान दिलं आहे. ”केवळ राज्यातच कशाला? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणूक घ्या!” असा टोला पवारांनी भाजपला लगावला आहे.
मुबंईत एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी दिलेल्या आव्हाना संदर्भांत पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ”मध्यावधी फक्त देशाच्या निवडणुका होतात. एखाद्या राज्याची मध्यावधी किंवा लोकसभेच्या मध्यवधी निवडणुका घ्यायच्या असल्या तर ते भाजपच्याच हातात आहे. भाजपाने केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेऊन पुन्हा निवडणूक घ्यावी,” असा खोचक सल्ला पवारांनी भाजपला दिला.
राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. सगळ्याच विषयांवर सगळ्यांची मतं जुळतील असं नाही. मात्र, एकूण व्यवस्थित चाललं आहे असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, फडणवीसांच्या आव्हानाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी’ हिम्मत असेल तर सरकार पडून दाखवाच असं प्रतिआव्हान दिलं आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.