कुस्ती पैलवानांशी होते, ‘अशां’शी नाही; बार्शीच्या बालेकिल्ल्यातून पवारांचे फडणवीसांवर टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. त्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बार्शी. बार्शीचा सुभेदारही राष्ट्रवादीच्या पडत्या काळात शरद पवारांची साथ सोडून गेला. अशा परिस्थितीत शरद पवार सोलापुरात येऊन काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार पहिल्यांदाच बार्शीत आले आणि त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. मोदी सरकारच्या पोकळ घोषणांवर त्यांनी आज मनसोक्त ताशेरे ओढले. ‘छत्रपतींचा आशीर्वाद आणि चला देऊ मोदींना साथ’ हा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अरबी समुद्रात एकही वीट रोवली नाही. शिवरायांना फडणवीस सरकारच्या या भूमिकेने काहीही फरक पडणार नाही असं म्हणतानाच जिथे भवानी तलवार तळपली तिथे सेने-भाजपच्या कारकिर्दीत छमछम बघायला मिळणार असल्याची कोपरखळी पवारांनी मारली. बार्शीमध्ये विकास करण्यासाठी पक्षांतर केलं आहे असं काहीजण म्हणतात. पण सत्ता असताना त्यांनी काय दिवे लावले हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे असं पवार म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षातील गळतीनंतर आणि गलितगात्र झालेल्या काँग्रेसची अवस्था पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, कुस्ती खेळायला आता समोर कोणीच प्रतिस्पर्धी नसल्याचं विधान केलं होतं. याला प्रत्युत्तर उत्तर देताना, कुस्ती पैलवानाशी होते ‘अशां’शी नाही म्हणून पवारांनी मुख्यमंत्र्यांवर शेलक्या भाषेत टीका केली. शिवसेनेच्या १० रुपयात जेवण देण्याच्या घोषणेला उत्तर देताना, सरकारला राज्य चालवायचंय की स्वयंपाक करायचाय? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. आधी झुणका भाकर केंद्र व्यवस्थित सुरु होती, त्याकडे दुर्लक्ष का केलं याचा जवाब सेनेनं द्यावा असंही पवार यावेळी म्हणाले.

अमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, “आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद ३७१ बद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असं भाजपला वाटत असेल तर ३७० आणि ३७१ वर भाजपा वेगळी भूमिका का घेत आहे? हा सवालही पवारांनी केला. नागालँडसह ९ राज्यात आम्हाला जमीन घेता येत नाही, याकडे सरकारने तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी पवारांनी केली. अमित शहांना या सभेत टारगेट करताना, हा माणूस झोपेत पण कलम ३७० बडबड करत असणार असा टोला पवारांनी लगावला दिलीप सोपलांच्या सेना प्रवेशानंतर पवार बार्शीत काय बोलणार याची उत्तर मिळाली आहेत. आता पवारांनी दिलीप सोपलांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना आणि अमित शहा यांच्यावर टीकेचे चांगलेच ताशेरे ओढल्याने सोलापूरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.