विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी अद्याप महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही. भाजप शिवसेना सत्तास्थापनेवरुन एकमेकांवर आखपाखड करत असताना मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा नवी मास्टरप्लान शरद पवार आखत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न शरद पवार करत असल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच्या राज्यातील घडामोडी पाहता या चर्चेला बळ मिळतंय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्यातल्या ओल्या दुष्काळाच्या निमित्तानं एकमेकांशी फोनवरून चर्चा केली होती. त्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवारांची त्यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही अलिकडच्या काळात दोन ते तीन वेळा शरद पवारांची प्रत्यक्ष भेट घेतलीय. तर दुसरीकडे राज ठाकरेंचे विश्वासू संदीप देशपांडे यांनीही नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. या सगळ्या घडामोडी पाहता दोन्ही ठाकरेंना एकत्र आणणारा दुवा म्हणून शरद पवार सक्रीय झाले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय.