हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यामध्ये सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार मध्ये एकमेकांवर आरोप केले जात आहेत. यात महत्वाचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात एकमेकांवर टीका-टिप्पणी होत आहे. या दरम्यान फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना इशारा दिला आहे. फडणवीसांनी बॉम्ब लगेच फोडावा, अन्यथा तुमच्या हातातच फुटेल, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यांना एवढंच सांगणे आहे की, फडवीस बॉम्ब फोडायला उशीर का लावता? दिवाळीनंतर फोडण्याची वाट पाहू नका आताच फोडून टाका. नाहीतर तो तुमच्याच हातात फुटेल.
कोणाकडे बॉम्ब असेल असे राजकीय नेते सांगत असतील तर ते स्वत:च्या जीवाशी खेळत आहेत. ताबडतोब त्यांनी एक तर बॉम्ब फेकला पाहिजे किंवा तो संपवला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशीसंबंध नाही. मी भाजपामधील १० पदाधिकारी देऊ शकतो. जे तुरुंगांमधून शिक्षा भोगून बाहेर आहेत आणि आज पक्षाचे पदाधिकारी आहेत, असेही राऊत म्हणाले.