औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील मुकुंदवाडी परिसरातील 13 वर्षीय बालिकेचा चिंचोली गावातील 18 वर्षीय तरुणासोबत 19 जून रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. 18 जूनला हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला. खबऱ्याने चिकलठाणा पोलिसांना या विवाहाची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत ही कारवाई केली.
सर्वत्र कोरोनाचा लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक ठिकाणी कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे सुरु आहेत. अशा स्थितीत मुकुंदवाडी येथील 13 वर्षीय मुलीचा चिंचोली येथील 18 वर्षीय तरुणासोबत विवाह करण्याची औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी येथे तयारी सुरू होती. एक दिवस आधीच म्हणजे 18 जूनला हळदीचा कार्यक्रम देखील झाला होता. सकाळी 11 च्या सुमारास विवाह पार पडणार होता. मात्र या विवाहाची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी तातडीने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांना या विवाहाची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी दाखल होत हा विवाह थांबवला.
यावेळी वधू – वर यांच्यासह त्यांच्या आई वडिलांना पोलिसांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. योग्य मार्गदर्शन करून नोटीस देऊन आई – वडिलांसह वराला सोडण्यात आले. वधूचे वय कमी असल्याने तिची रवानगी मात्र सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली. हा विवाह थांबण्यात पोलीस उपनिरीक्षक जी. टी. राऊत, महिला पोलीस हवालदार छाया नगराळे, पोलीस नाईक सोपान डकले, पोलीस शिपाई दीपक सुरोशे यांनी कामगिरी बजावली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.