मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संधान व्यक्त केलं आहे. आजचा निर्णय हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. याशिवाय फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे.
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा ! #CBI #SupremeCourt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2020
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत हा तपास सीबीआयकडे सोपवला जावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्यासही न्यायालायने सांगितलं आहे.
याचसोबत पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र कोर्टाने त्यासाठी नकार दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”