हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मागणी, नवाब मलिक याचा राजीनामा आदी विषयावरून विरोधक भाजप नेत्यांनी चांगलाच गदारोळ घातला. यावेळी औरंगाबादच्या नामांतराचा विषय सभागृहात उपस्थित होताच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पावित्रा घेतला. “पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी प्रसंगी राजीनामाही देईन,” असे मुनगंटीवार यांनी यावेळी म्हंटले.
आज मुंबईत अत्यंत वादळी सहा स्वरूपात विधिमंडळ सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. यावेळी औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरताना मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “गरम लोखंडी सळ्या डोळ्यात टाकतायत, नखं तोडतायत, चमडी काढतायत, तरी हा छावा म्हणतो, कितीही अत्याचार कर, मी धर्मांतर करणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल. त्यांनाही सत्तेसाठी लाचार होता आलं असतं. पण ते झाले नाहीत. असेही छत्रपती संभाजीराजे होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शिवसेनेने आणि महाविकास आघाडी सरकारने आजच यासंदर्भातील घोषणा करावी.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “मी सभागृहात वचन देतो. तुम्हाला केंद्राची मदत या विषयाला लागत असेल तर मी स्वतः केंद्राच्या कार्यालयात उपस्थित राहतो. मी मदत करू शकलो नाही तर राजीनामा देईन. आयुष्यात निवडणुक लढणार नाही. पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात,” असे मुनगंटीवार यांनी म्हंटले.