अनिल देशमुखांची मालमत्ता तत्काळ परत करा; सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख याच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांना अटक केली. दरम्यान या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले असून देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याचे आदेश ईडीला दिले आहेत.

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करत घर आणि त्यांच्या कार्यालयावर छापा टाकत 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये अनिल देशमुख यांचे पुत्र योगेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी शीतल देशमुख यांच्या वैयक्तिक 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी न्यायालयाने ईडीला फटकारले असून देशमुख यांच्या कुटुंबाला दिलासा दिला. न्यायालयाने ईडीला देशमुख यांच्या जप्त केलेल्या सर्व ११ मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील माहिती अनिल देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी दिली.