हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा संचारबंदीमुळे शाळा महाविद्यालये उशिरा सुरु होणार आहेत. अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु होण्याची वाट बरेच विद्यार्थी आणि पालक बघत होते. पुणे व पिंपरी चिंचवड भागातील प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दिनांक १५ जुलैपासून प्रवेश प्रक्रियेचा भाग -१ अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव तथा पुणे विभागीय सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागणार असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी कोठेच होणार नाही याची दक्षता घेण्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच महाविद्यालयांना २ ते १५ जुलै पर्यंत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली आहे.
महाविद्यालयांनी नोंदवलेल्या माहितीची तपासणी करून २ ते १६ जुलै या कालावधीत विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज -१ भरण्यासाठी १५ जुलै पासून दहावीचा निकाल लागेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज मंजूर झाला आहे याची खात्री करणे तसेच मार्गदर्शन केंद्र निवडणे यासाठीही १५ जुलैपर्यंतचा कालावधी असणार आहे. १६ जुलैपासून विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी सुरु होणार असून दहावीचा ऑनलाईन निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांना अर्ज-२ भरता येणार आहे.
शाळांना आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करता येणार आहेत. यंदा माहिती पुस्तिका छापील स्वरूपात मिळणार नाहीत. ऑनलाईन नोंदणी करतानाच विदयार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. शाळांद्वारे अर्ज मंजूर करण्याची प्रक्रियाही ऑनलाईन होणार आहे. प्रवेश अर्जही ऑनलाईन जमा करायचे आहेत. यासाठी मुख्याध्यापक आणि तंत्रसाहाय्यक यांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. यासोबतच विद्यार्थी आणि पालक यांचे उदबोधन वर्ग घेण्याचे वेळापत्रकही वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग -१ मंजूर करण्याची जबाबदारी माध्यमिक शाळांची असणार आहे. राज्यमंडळाव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांच्या अर्जाचा भाग -१ मंजूर करण्याची जबाबदरी मागर्दर्शन केंद्रांना देण्यात आली आहे. https:\\pune.11thadmission.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.