हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारची राजधानी असणाऱ्या पटणा जिल्ह्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याच लग्नात उपस्थित असणाऱ्या १०० हुन अधिक लोकांना कोरोना झाल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांसोबत आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेची देशात सर्वत्र चर्चा सुरु आहे. संबंधित नवरा मुलगा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, तो गुरुग्राम येथे नोकरी करत होता.
काही दिवसांपूर्वी लग्नासाठी म्हणून हा मुलगा पटणा येथे आला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे नवऱ्यामुलाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी केली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. पटणा जिल्ह्यातील पालीगंज गावात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पटणाच्या आरोग्य यंत्रणांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याने लग्नात उपस्थित असणाऱ्या तसेच त्यांच्याशी संबंधित सर्वांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. मृताच्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी घेण्याआधीच मृतदेहावर अंतिम संस्कार केले आहेत.
संबंधित लग्न सोहळा १५ जून रोजी झाला होता. लग्नानंतर दोनच दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाला होता. नवरदेवाला कोरोनाची लक्षणे असल्याचे आरोप परिसरातून होत आहेत. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळले आहेत. लग्नासाठी गुडगांव येथून घरी आल्यावर तो १४ दिवस विलगीकरणात राहिला होता असे त्यांनी सांगितले. लग्नानंतर अचानक त्याची तबयेत बिघडली होती, त्याच्या पोटात दुखत होते म्हणून रुग्णालयात नेट असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला असे कुटुंबीयांनी सांगितले. नवरदेवाच्या मृत्यूची बातमी मिळताच लग्नात उपस्थित लोकांची चाचणी केली असता १०० हुन अधिक लोकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 9 हजार 640 रुग्ण आढळले आहेत. यापैकी सध्या 2,188 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत 7,390 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या 62 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.