हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनावर रेमडेसिविर हे औषध रामबाण उपाय ठरत आहे. काहीजण हे औषध बांग्लादेशमधून आयात करत आहेत. मात्र देशातील औषध निर्माता कंपन्या या औषधाच्या निर्मितीसाठी परवानगी मिळण्याची वाट बघत आहेत. सध्या हे औषध बांगलादेशमध्ये मिळत आहे. मात्र भारतात या औषध निर्मितीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. हे औषध आयात करण्याची परवानगी मिळाली आहे. औषध आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४५ मधील नियम ३६ नुसार, वैयक्तिक वापरासाठी औषध आयातीसाठी परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यासाठी प्रिस्क्रिप्शन अनिवार्य असणार आहे. जगाला आपण औषध पुरवठा करत आहोत. पण या औषधाची निर्मिती करण्यास अद्याप भारतीय कंपन्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
सध्या हे औषध रुग्ण वैयक्तिकरित्या मागवीत आहेत. औषध कंपन्या हे औषध तयार करण्याची परवानगी कधी मिळते याची वाट पाहत आहेतच मात्र त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नही करीत आहेत. बांग्लादेशमधून आयात होणाऱ्या या लसीची औषध नियामक मंडळाने अजून चाचणीही केलेली नाही अशी माहिती समोर आली आहे. तसेच भारतीय यंत्रणांना बांग्लादेशच्या कंपन्यांवर जास्त विश्वास आहे का? असा प्रश्न देखील विचारला जातो आहे.
अमेरिकेतील रेमडेसिविरची निर्माता कंपनी जिलीड सायन्सेसने मे महिन्यात चार कंपन्यांना या औषधाच्या निर्मितीची परवानगी दिली होती. सिप्लाय, मायलॅन, हिटेरो आणि जुबिलन्ट लाइफ सायन्सेस या चार कंपन्यांना भारतात निर्मिती आणि विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे. सिप्ला आणि हिटेरोने निर्मिती सुरू करण्यासाठी परवानगीचा अर्ज केला आहे. पण अजून परवानगी मिळालेली नाही. दरम्यान कंपन्यांच्या निर्मिती सुविधांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. कंपन्यांकडून या उत्पादनाच्या नमुन्यांच्या चाचणीच्या निकालाची आता प्रतिक्षा आहे. असे नियामक मंडळाने म्हंटले आहे. एकदा ही चाचणी झाली आणि इतर आवश्यक बाबी पूर्ण झाल्या की कंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरू होईल, अशी माहिती डीसीजीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.