विहीरीत ट्रॅक्टर कोसळून बालक ठार; क्लचवर पाय पडल्याने ट्रॅक्टर कोसळला थेट विहिरीत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

कवठेमहांकाळ बनेवाडी येथे विहीरीजवळ उतारावर उभा केलेला बागेतील लहान ट्रॅक्टरवर दोन लहान मुले खेळत असता अचानकपणे तो ट्रॅक्टर विहीरीत कोसळला. या दुर्घटनेत तीन वर्षांचा बालक जागीच ठार झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने एका सहा वर्षाच्या बालकाचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. तेजस श्रीरंग माळी असे मृताचे नांव आहे.

बनेवाडी ते लक्ष्मी खिंड दरम्यान श्रीरंग माळी यांची द्राक्ष बाग आहे. बागेतील काम आटोपल्यानंतर माळी यांनी विहीरी जवळ उताराला ट्रॅक्टर उभा केला होता. यावेळी गुरुनाथ श्रीरंग माळी व तेजस श्रीरंग माळी अशी दोघे लहान भांवडे ट्रॅक्टरवर बसून खेळत होती. यावेळी अनावधानाने मुलांचा पाय क्लचवर पडला. ट्रॅक्टर न्यूट्रल झाला व उतार असल्याने चालू झाला. व सदरचा ट्रॅक्टर जवळच असलेल्या विहीरीत कोसळला.

याची माहिती मिळताच सर्वजण विहीरीजवळ धावून गेले. यावेळी विहीरीत उडी मारून गुरूनाथचे प्राण वाचवण्यात यश आले. विहीरीत दहा बारा फूट पाणी होते. मोटर सुरू करून पाणी काढण्यात आले. कवठेमहांकाळचे पोलिस कर्मचारी व ग्रामस्थांनी प्रयत्न करून मृत तेजस याचा मृतदेह व ट्रॅकर मशीनच्या साहाय्याने विहीरीतून बाहेर काढला. शनिवारी रात्री साडे दहा वाजेपर्यंत बचाव मोहीम सुरू होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like