गळ्यात पट्टा घालून कुणाची गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही; ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमच्याकडे दोन व्यक्ती भेटल्यानंतर राम-राम घालतात. तर तुमच्याकडे जय श्रीराम म्हणातात. शेवटी राम आहेच. मी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथून माती घेतली आणि मग रामलल्लाच्या दर्शनाला गेलो. माघारी आल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. मुस्लिमांचा द्वेष करा, असं बाळासाहेबांनी कधीही सांगितलं नाही. गळ्यात पट्टा घालून कुणाचीतरी गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही, असा टोला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता शिंदे गटाला लगावला.

आज मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी ते म्हणाले की, तोडा-फोडा ही इंग्रजांची निती भाजप अवलंबतय, भाजपचं हे असंच सुरू राहिलं तर हिंदू म्हणायलाही लाज वाटेल. राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. हृदयात राम, हाताला काम हीच आमची भूमिका राहिलीय.आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदुत्वाची साथ कायम आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यात आम्हीच लक्ष घातलं. राम मंदिराचा मुद्दा खितपत पडला होता, परंतु आम्ही भूमिका घेतली. हवं तर स्वतंत्र कायदा करा परंतु राम मंदिराचा प्रश्न सोडवा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मी अयोध्येत जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथली माती प्रभू रामाकडे नेली होती. नंतर मी मुख्यमंत्री झालो आणि राम मंदिरही उभं राहात आहे. आम्ही महाराष्ट्रात राम-राम म्हणतो आणि तुमच्याकडे जय श्रीराम म्हणतात. शेवटी राम आहेच. ‘राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे’ असं बाळासाहेब म्हणायचे. हेच आमचे संस्कार आहेत, असे ठाकरे यांनी म्हंटले.

त्यावेळी मोदींना बाळासाहेबांनी वाचवलं

यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील एक आठवण सांगितली. ऐकमेकांचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे. नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट वेळ होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा बचाव केला होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. राजधर्माचं पालन झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.