व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आरोग्याचे कारण सांगून शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्याचा प्रयत्न; नव्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लवकरच मुख्यमंत्री पद देण्यात येईल याबाबत राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. आता मुख्यमंत्रीपदासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वक्तव्याने या चर्चेत आगीत तेल ओतायचे काम केले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोग्याच्या कारणावरून पदावरून बाजूला सरकवत त्या जागी अजित पवार यांना घेण्याचा विचार दिल्लीतील हायकमांड करत असल्याचे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

गडचिरोली येथे पत्रकारांशी बोलताना, “एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते सांगतात की, त्यांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांना अॅडमिट करायची गरज आहे. तर सीएमओ ऑफिसकडूनंही या बातमीला दोन दिवसात पुष्टी मिळते. हे पाहता मुख्यमंत्र्यांना आरोग्याच्या दृष्टीने अॅडमिट करायचं, आणि आरोग्याचं कारण पुढे करून त्यांचा राजीनामा घ्यायचा आणि अजित दादांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना, अशी शंका येते.” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हणले आहे.

त्याचबरोबर, “मुख्यमंत्री शिंदेंचा पावसाळी अधिवेशनातील सहभागही अत्यंत कमी होता. सीएम शिंदे १३ दिवसांच्या अधिवेशनाच्या काळात फक्त दोन दिवस उपस्थित होते. खालच्या सभागृहातही फक्त चार वेळा त्यांची उपस्थिती होती. तेही दिड दोन तासांची उपस्थिती होती. ही उपस्थिती, त्यांचा सहभाग, त्यांची सार्वजनिक कार्यक्रमांना टाळणे, आराम करण्यासाठी बाहेर जाणं, तब्येतीची काळजी घेणं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्रालाही त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. त्यामुळे त्याचा खुलासा महाराष्ट्राला अपेक्षित असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हणले आहे.

इतकेच नव्हे तर, “मुख्यमंत्री एका पक्षाचे नाही तर संपूर्ण राज्याचे असतात. त्यांच्या प्रकृतीबाबत सीएमओ ऑफिसकडून जी माहिती समोर येतेय, ते पाहता आरोग्याच्या दृष्टीने त्यांना त्यांच्या पदापासून दूर करण्याचा प्रयत्न दिल्लीतील त्यांच्या हायकमांडने सुरू केला असावा” अशी शंका वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सध्या अजित पवारांकडे मुख्यमंत्री पद देण्यात येईल का? या चर्चेने जोर धरला आहे. अशातच या पदाबाबत अजित पवार गटाच्या मंत्र्यांकडून देखील वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. मात्र, “मुख्यमंत्रीपदामध्ये मला कोणताही रस नाही. त्या पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे योग्यरित्या पार पाडत आहेत तसेच मी माझ्या पदाचे काम बघत आहे” असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.