हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या आघाडीमध्ये प्रमुख असणारे तिन्ही पक्ष आपले वेगवेगळे फॉर्मुले मांडत आहेत. त्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच, लवकरच महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळेच आघाडी एकसंध राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे की, “राम मंदिर उद्घाटन झाले की राज्यात महायुतीविरोधात केवळ एकच पक्ष राहील. महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बदलणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेसच राज्यात शिल्लक राहील.”
मुख्य म्हणजे, “देशातील अनेक पक्ष आज एकत्र झाले आहेत. अनेक पक्ष संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष पंतप्रधान मोदींसोबत येतील. अजित पवार हे भाजपला पाठिंबा देतील” असा दावा यापूर्वी रवी राणा यांनीच केला होता. पुढे जाऊन हा दावा देखील त्यांचा खरा ठरला. त्यामुळे आता महाविकास आघाडी संदर्भात केलेला रवी राणा यांचा दावा हा खरा ठरतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमधून एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांचा गट बाहेर पडल्यापासून केवळ उद्धव ठाकरे यांचा गट शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस आघाडीमध्ये प्रमुख स्थानी राहिले आहेत. यामध्ये आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे देखील युती केल्यामुळे जागा वाटपात त्यांचा देखील महत्वपूर्ण वाटा असणार आहे. यात आघाडीबरोबर असलेले इतर पक्ष देखील आहेत, त्यामुळे आघाडीला विचारपूर्वक जागा वाटपासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. नाहीतर पुढे जाऊन आघाडीतून एक तर पक्ष देखील बाहेर पडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.