साऊथम्पटन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन याने त्याच्या निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. प्रतिस्पर्धेमुळे आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, ज्यादिवशी स्वत:मध्ये सुधार करण्यासारखे वाटणार नाही, त्या दिवशी आपण क्रिकेट खेळणे सोडू असे आर.अश्विन म्हणाला. सध्या आर.अश्विन इंग्लंडमधील साऊथम्पटन या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात खेळत आहे.
काय म्हणाला आर.अश्विन
आयसीसीशी बोलताना आर.अश्विन म्हणाला,’टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्ही कायमच परफेक्ट होण्यासाठी प्रयत्न करता, त्यामुळे मी असे करतो. मी करियरमध्ये जे काही मिळवले ते याच विचारामुळे. मी कोणत्याच गोष्टीत तडजोड केली नाही, कायमच स्वत:मध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. जर मी वेगवेगळ्या गोष्टी करणे सोडून दिले आणि नवीन काही करण्यासाठी धैर्य दाखवले नाही, तर मी क्रिकेट खेळणे सुरू ठेवू शकणार नाही.
34 वर्षांच्या अश्विनने आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये 409 विकेट घेतल्या आहेत. विजयानंतर आपण फार जल्लोष का करत नाही याचे कारण देताना आर.अश्विन म्हणाला विजय ही फक्त एक घटना आहे. विजय योजना आणि अभ्यासामुळे मिळतो, त्यामुळे मी जिंकल्यानंतर यापेक्षा चांगलं काय करू शकता येईल याचा विचार करतो असे म्हणाला. भारतामध्ये तुमचे खूप कौतुक होते. पण मी एक सामान्य व्यक्ती आहे, ज्याला खेळून शांतता आणि आनंद मिळतो, असे वक्तव्य आर.अश्विनने केले आहे.