साऊथम्पटन : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय टीम हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे.भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय टीमने हाताला काळी पट्टी बांधली. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक जिंकले तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग चौथ्या क्रमांकावर राहिले होते.
मिल्खा सिंग यांची 19 मे रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर ते चंडीगडच्या त्यांच्या घरी आयसोलेशनमध्ये होते, कारण त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. यानंतर 24 मे रोजी त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मोहालीच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. यानंतर 3 जून रोजी त्यांना चंडीगडमधल्याच दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर 13 जून रोजी मिल्खा सिंग यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, पण कोरोनानंतरच्या लढाईमध्ये मिल्खा सिंग यांना यश आले नाही.
यामुळे भारताच्या सर्वोत्तम खेळाडूला आदरांजली देण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचा सामना इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारताने या महामुकाबल्यासाठी अश्विन आणि जडेजा या दोन स्पिनरना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे तर न्यूझीलंडने मात्र एकाही स्पिनरला संधी दिलेली नाही.
न्यूझीलंडची टीम
टॉम लेथम, डेवॉन कॉनवे, केन विलियमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डे ग्रॅण्डहोम, काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट
भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह