मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलच्या अगोदर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. पण या सीरिजमध्ये न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी स्वत:ला ताजातवाना आणि फिट ठेवण्यासाठी बोल्ट इंग्लंडविरुद्धची सीरिज खेळणार नाही.
ट्रेन्ट बोल्ट शुक्रवारी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याने आपल्या घरीच आठवडाभर बॉलिंगचा सराव केला आहे. तो इंग्लंडविरुद्धच्या दोन टेस्टमध्ये तो खेळेल, असे मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टड यांच्याकडून देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला होता. यानंतर बोल्ट आयसोलेशनमध्ये राहिला होता. या कालावधीमध्ये त्याने स्वत:च्या बॉलिंगवर काम केले असे देखील गॅरी स्टड यांनी सांगितले आहे.
भारतीय टीम सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन असून 2 जूनला मुंबईवरून इंग्लंडला रवाना होणार आहे. इंग्लंडला पोहोचल्यानंतर खेळाडू साऊथम्पटनमध्ये क्वारंटाईन होणार आहेत. यानंतर 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला सुरुवात होणार आहे. या फायनलनंतर दीड महिना भारतीय टीम इंग्लंडमध्येच राहणार आहे. यानंतर भारत-इंग्लंड यांच्यामध्ये 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.