विशेष प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन एकमत नसल्याचे घडामोडींवरुन दिसत आहे. अशात आता शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी फोनवर चर्चा केल्याचे समजत आहे.
सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल हे तिघेही मुंबईला रवाना झाले आहेत. ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं राज्यातील सत्तापेच सुटणार का? याबाबत उत्सुकता आहे.
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तर शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असून आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे.