उदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच्या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सर्वस्वी स्वतःच्या खांद्यावर घेतलेल्या आदित्य ठाकरे यांनी आज सातारचा दौरा केला आहे. पाटणमधील शिवसेनेचे उमेदवार शंभूराजे देसाई आणि सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी त्यांनी आज भव्य सभा घेतली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्याला हार घालून सभेची सुरुवात करण्यात आली. मी या भागात आलोय खरं, पण इथल्या आमदार खासदारांसाठी प्रचाराची गरज आहे का? असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची वाहवा मिळवली.

मी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला असायचा, आता मात्र फक्त राष्ट्रवादाचा नाद इथे घुमेल असं म्हणत उदयनराजेंच्या येण्यामुळे हे सरकार आणखी मोठं बनणार असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना आता जनता कंटाळली असून महाराजांच्या कमिटमेंटचा दाखला देत मीसुद्धा तुम्हाला नवीन महाराष्ट्र घडवण्याची कमिटमेंट देतोय असं आदित्य ठाकरे म्हणाले. मी स्वतः निवडणूक लढवत असून मला तुमचे आशीर्वाद द्या असं भावनिक आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी जनतेला केलं.

आदित्य ठाकरेंनी एवढी स्तुती केल्यानंतर उदयनराजेही मागे हटले नाहीत. आदित्य हे आमच्या मित्रांचे चिरंजीव असून ते आता महाराष्ट्रातील तरुणांची धडकन बनले आहेत अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं. पंतप्रधानपदासाठी पवारांना बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. सुप्रिया सुळे राज्यसभेसाठी पहिल्यांदा उभ्या राहिल्या तेव्हा त्यांच्यासमोरही बाळासाहेबांनी उमेदवार दिला नाही. आज मात्र आदित्य समोर पवारांनी उमेदवार देऊन बाळासाहेब ठाकरेंच्या उपकारांची चांगली परतफेड केली अशी टीका उदयनराजेंनी शरद पवारांवर केली.