हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान सरकारने त्यांचे विदेशी कर्ज भरण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा भक्कम करण्यासाठी १५ अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज घेण्याची योजना आखत आहे. हे एका वर्षात पाकिस्तानने घेतलेले सर्वात मोठे कर्ज असेल. स्थानिक माध्यमांनी रविवारी याबाबत सांगितले. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला सांगितले की, २०२०-२१ आर्थिक वर्षात सुमारे १५ अब्ज डॉलर्सच्या विदेशी कर्जापैकी जवळपास १० अब्ज डॉलर्स हे जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. ही रक्कम व्याजाच्या देयका व्यतिरिक्त आहे.
या वृत्तानुसार, उर्वरित रक्कम ही देशाच्या बाह्य सार्वजनिक कर्जाचा भाग होईल, जी मार्चच्या अखेरीस ८६.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. पाकिस्तानने एका वर्षात १५ अब्ज डॉलर्सचे घेतलेले कर्ज हे त्या देशातील आव्हाने आणि वाढती कर्जाचे संकट दर्शविते. पाकिस्तानमध्ये सध्यातरी कर्जाशिवाय परकीय चलन येणे शक्य नाही.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे असलेले १२ अब्ज डॉलर्सचा एकूण परकीय चलनाचा साठा मुख्यतः कर्जामुळे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त मंत्रालयाला आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सावकार, वाणिज्य बँका, युरोबॉन्ड जारीकर्ता आणि आयएमएफ कडून एकूण १५ अब्ज डॉलर्स मिळणे अपेक्षित आहे. विदेशी कर्जावरचे पाकिस्तानचे अवलंबित्व वाढत आहे. जुलै २०१८ ते जून २०२१ पर्यंत त्यांच्यावर एकूण ४० अब्ज डॉलर्स इतके नवीन कर्ज झाले आहे. त्यापैकी ते जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी २० अब्ज डॉलर्स वापरणार आहे, तर उर्वरित १५ अब्ज डॉलर्स हे त्यांच्या त्याच्या बाह्य सार्वजनिक कर्जात जोडले जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.