महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रफुल्ल पाटील | मुंबई प्रतिनिधी

युती होणार की नाही यावर खलबतं सुरू असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या ४ दिवस आधी विशेष परिपत्रकाद्वारे युतीची घोषणा करण्यात आली. जागावाटपाबाबत कोणताही अधिकृत आकडा समोर आला नडला तरी भाजप आणि मित्रपक्ष १६४ जागांवर तर शिवसेना १२४ जागांवर लढणार असल्याचं निश्चित मानण्यात येत आहे. उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुड विधानसभेमधून लढणार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातून दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांच्या बंधूंना तिकीट देण्यात आलं आहे.

एकनाथ खडसे आणि विनोद तावडे या दिग्गज नेत्यांनाही भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळालं नाही. वाटाघाटीमध्ये ज्या ठिकाणी शिवसेना सक्षम आहे, अशा जागा भाजपने अद्यापही जाहीर केल्या नाहीत. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. स्वबळावर निवडून येण्याचं गणित डोक्यात असताना गरज लागलीच तर मित्रपक्षांना १२ ते १५ जागा देण्याचा डाव भाजपने खेळला आहे. २०१४ साली याच प्रकारे बोलणी झालेली असताना शिवसेनेने नमती भूमिका घ्यायला नकार दिल्यामुळे युती फिस्कटली होती. यंदा मात्र भाजपने पुढाकार घेत १२५ उमेदवार जाहीर करून शिस्तबद्ध खेळी खेळल्याचं दिसून येत आहे.