हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर एअरलाइन्सचा संस्थापक विजय मल्ल्या याचे पुढील काही दिवसांत कधीही भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. इंग्लिश बिझिनेस इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मल्ल्याच्या प्रत्यार्पणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. माजी खासदार आणि देशातील सर्वात मोठी दारू कंपनी असलेल्या युनायटेड ब्रुव्हरीजचा मालक मल्ल्या याने किंगफिशर एअरलाइन्स सुरू केली, जी नंतर बंद पडली. त्याच्याविरूद्ध ९००० कोटी रुपयांचा फ्रॉड आणि मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण वैयक्तिक कारण सांगून मे २०१६ मध्ये तो भारतातून पळाला.
तेव्हापासून तो युकेमध्ये राहत आहे. मल्ल्याने कमीतकमी १७ भारतीय बँकांची फसवणूक केली तसेच बेकायदेशीरपणे लोन घेतले आणि संपूर्ण पैशाचा किंवा कर्जातील काही भाग हा परदेशात सुमारे ४० कंपन्यांच्या खात्यामध्ये जमा केला.
आता काय होणार
मल्ल्याच्या प्रत्यर्पणातील सर्वात मोठा अडथळा १४ मे रोजी दूर झाला जेव्हा मल्ल्या प्रत्यर्पणाच्या विरोधात सुरु असलेला खटला हरला. आता सरकारला त्याला येत्या २८ दिवसांत परत आणावे लागेल. १४ मेपासून २० दिवस आधीच गेले आहेत. अशा परिस्थितीत त्याला येत्या आठ दिवसांतच परत आणावे लागेल.
एप्रिलमध्ये यूके हायकोर्टाने आपल्या एका निर्णयात म्हटले होते की, विजय मल्ल्या याचे भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. यानंतर,१४ मे रोजी कोर्टाने मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी देण्यास नकार दिला. ब्रिटिश कायद्याचे ज्ञान असणार्या लोकांच्या मते, मल्ल्याकडे प्रत्यर्पण टाळण्यासाठी दोन पद्धती आहेत, त्यातील एक आश्रय मागणे आहे. डिसेंबर २०१८ मध्येच लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने मल्ल्याला भारताला प्रत्यार्पित करण्याचे आदेश दिले होते.
मल्ल्या येत्या काही दिवसात भारतीय तुरूंगात असेल
ईडीच्या सूत्रानुसार, मल्ल्याची याचिका ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही सर्व औपचारिकता देखील पूर्ण केल्या आहेत. सीबीआय आणि ईडीची टीम त्याच्या प्रत्यार्पणासाठी काम करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित सीबीआय सूत्रांनी सांगितले की, प्रत्यर्पणानंतर आम्ही पहिले त्याला ताब्यात घेऊ, कारण आम्ही पहिल्यांदा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.