टीम हॅलो महाराष्ट्र | उद्धव बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं नाव. वडिल बाळासाहेब ठाकरेंच्या कर्तृत्वाच्या सावलीत उद्धव ठाकरे खुजे ठरतील का असं साधारण २०११ पर्यंत वाटायचं. २०१४ ला राज्यात स्थापन झालेल्या युती सरकारमध्येही शिवसेना असून नसल्यासारखीच वाटायची. भाजपच्या दमात राहणारा आणि खिशात राजीनामा घेऊन फिरणारा शिवसेनेचा वाघ अशीच एकंदरीत प्रतिमा जनमानसाने या काळात अनुभवली. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते म्हणतात, ती वेळ २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनी दाखवली आणि अपघाताने का होईना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
फोटोग्राफी आणि पर्यटनाची नितांत आवड असणाऱ्या उद्धव यांनी वडिलांच्या आग्रहाखातर राजकारणात पाऊल टाकलं. पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे यांची पक्षातील सद्दी जवळपास संपली. २००५ नंतर उद्धव ठाकरेंनाच बाळासाहेबांचा अधिकृत उत्तराधिकारी म्हणून प्रोजेक्ट केलं केलं. शांत आणि संयमी स्वभाव ही उद्धव ठाकरेंची वैशिष्ट्ये आहेत. कुठे नमतं घ्यायचं, कुठे ताणायचं हे त्यांना चांगलंच जमतं. २०१४ ते २०१९ या काळात राज्यातील शिवसेना तशी खुंटलेलीच राहिली, याला कारण होतं भाजपच्या वर्चस्ववादी राजकारणाचं. मोदी हैं तो मुमकीन हैं म्हणत मोदी-शहांच्या धास्तीने शिवसेनेचा वाघ मांजरात रूपांतरित करायचं काम २०१९ पर्यंत जवळपास झालंच होतं. पण सेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे या एकमेव अटीने सेनेचा वाघ पुन्हा जिवंत झाला.
शरद पवारांच्या मार्गदर्शनाने कट्टर वैरी असलेले काँग्रेस आणि शिवसेना पक्षही एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु झाला. मंत्रिमंडळात अगदी नवख्या असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चावू की गिळू या नजरेने सातत्याने लक्ष करणारे विरोधी पक्षनेते कायमच त्यांच्यावर कुरघोड्या करत राहिले. मात्र करुन दाखवायचं हा बाणा अंगी बानलेल्या उद्धव ठाकरेंनी विरोधकांचे सगळे वार समन्वयाच्या आणि संवादाच्या माध्यमातून परतून लावले. आपल्या ज्वलंत हिंदुत्वाला संविधानिक धर्मनिरपेक्षतेची जोड देण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना महाराष्ट्रातील आणि देशातील जनता नव्यानेच अनुभवत आहे, आणि याला कारणही आहे उद्धव ठाकरेंनी विचारांमध्ये केलेला बदल. शेतकरी कर्जमाफी, कोरोनासारखं महाभयंकर संकट, तीन पक्षांचं सरकार चालवताना असणाऱ्या कुरबुरी, निसर्ग चक्रीवादळ, विस्कटलेली आर्थिक घडी या सगळ्याच आव्हानांना धीरोदात्तपणे सामोरं जात उद्धव ठाकरेंची वाटचाल सुरु आहे. कोरोना काळात जनतेला विश्वास देण्याचं, या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. सत्ता येत-जात राहतील, माणुसकी टिकली पाहिजे या हेतूने महाराष्ट्राची धुरा सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा प्रवास सोपा नक्कीच नाही.
कोरोना संकटाच्या काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या नेतृत्वाची विशेष दखल घ्यावी लागेल. शहरी भागात वाढलेल्या उद्धव यांना ग्रामीण महाराष्ट्राची नस समजणार नाही असं वाटत असतानाच सहकारी पक्षातील लोकांना सोबत घेत जनतेशी कायम संवाद साधण्यात ठाकरे कुठेही कमी पडले नाहीत. या काळातही अभ्यासाच्या पातळीवर अनेक गोष्टी करता येणं उद्धव ठाकरेंना शक्य होतं, जसं की टेस्टिंग किटच्या संशोधनाला प्रोत्साहन देऊन अधिक स्वस्त किटची निर्मिती करणं, परीक्षांच्या वेगळ्या पद्धती शोधून काढून विद्यार्थ्यांना शंकेच्या जाळ्यातून बाहेर काढणं इत्यादी..प्रशासनिक अनुभवांतून सध्या उद्धव ठाकरे पुढे जात असून येत्या काळात यात सुधारणा नक्कीच पाहायला मिळेल अशी आशा महाराष्ट्रातील जनतेला आहे.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं सारखं कौतुक करुन, त्यांची मर्जी राखून मी पुन्हा येईनचा अतिआत्मविश्वास असलेले नेते कितीही ओरडले तरी सरकार पडू देणार नाही, आणि कुणाच्या हातातील बाहुलाही बनणार नाही अशी आश्वासक भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली आहे. ३० वर्षं जुना भागीदार सोडताना स्वतःचा पक्षही काळाच्या कसोटीवर तपासून घेण्याचं धाडस शिवसेना पक्षप्रमुख दाखवत आहेत. वयाच्या ६१ व्या वर्षात प्रवेश करत असताना आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची वाटचाल अधिक संविधानिक, लोकशाही आणि आश्वासक होईल अशी अपेक्षा..!! जन्मदिवसानिमित्त हॅलो महाराष्ट्रकडून हार्दिक शुभेच्छा..!!