राज्यात ३१ मेपर्यंत ग्रीन झोनची संख्या वाढलीच पाहिजे; मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे नेता येईल हे पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाउनचे योग्य पालन होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. ”थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे काही शहरांमधील दृश्य गंभीर होते. पोलीस आणि प्रशासनाने गर्दीही होणार नाही आणि सुरक्षित अंतर राहिल हे पाहिलेच पाहिजे,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको
ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये आपण उद्योग-व्यवसाय काही प्रमाणात सुरू केले मात्र याठिकाणी रेड झोनमधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. घाई गर्दीने आपल्याला काहीही करायचे नाही. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतेच आहे पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हेही त्यांनी स्पष्ट केले.

नॉन कोविड रुग्णास दुर्लक्षित करू नका
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. आपापल्या भागातील डॉक्टर्सना , वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

रुग्ण माहिती अद्ययावत ठेवावी
यावेळी बोलताना मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले की, शहरी भागात असलेला करोना राज्याच्या ग्रामीण भागात शिरकाव होऊ न देणे महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी करोनाविषयक रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत ठेवायची आहे. तसेच चाचण्यांचे अहवाल वेळेत मिळतील याकडे बारकाईने लक्ष द्यायचे आहे. आयसीएमआरचा डाटा हाच प्रमाण मानला जाईल. यात कुठेही चूक होता कामा नये असे त्यांनी सांगितले. कंटेंटमेंट क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष द्यायचे आहे. हे क्षेत्र जितके लहान ठेवता येईल तितके ठेवा तसेच क्षेत्राच्या सीमा पूर्णत: बंद असतील, तसेच क्षेत्राच्या आतमध्ये देखील वेळच्यावेळी तपासण्या, सुरक्षित अंतर, फवारणी , जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहील व तेथील लोक हे पाळतील हे पाहावे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या
प्रधान सचिव राजीव जलोटा यांनी यावेळी कोरोना बाबतीत जिल्ह्यांची आकडेवारी आणि निष्कर्ष यांचे संगणकीय विश्लेषण केले आणि ५ दिवसांची सरासरी सादर केली. प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनीही याला अनुसरून माहिती दिली. देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ३१ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत तसेच देशातील एकूण मृत्यूच्या ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी असून रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी वाढून ९.३ दिवस इतका झाला आहे. देशात रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी ११.३ दिवस इतका आहे. मृत्यू दर देशात ३.२३ टक्के आहे तर महाराष्ट्रात देखील तो कमी होऊन ४.२२ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रात दर दशलक्ष १२२५ चाचण्या महाराष्ट्रात होतात त्या देशात सर्वाधिक आहेत, असे सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here