कोरोनाचे निदान झालेल्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचे निधन 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिरीष दीक्षित यांचे कोरोना चाचणीचे अहवाल सकारात्मक आले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसून त्यांचा मृतदेह सायन रुग्णलयात नेण्यात आला आहे. ते ५५ वर्षाचे होते.

महत्वाची गोष्ट अशी समोर आली आहे, की दीक्षित सोमवारपर्यंत कामावर हजर होते.  ते पाणीपुरवठा खात्याचे प्रमुख होते तसेच त्यांच्याकडे विशेष अभियांत्रिकी विभागाची उपायुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी देखील होती.  १९८७ मध्ये त्यांनी त्यांचा कार्यकाळ सुरु झाला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठा विषयक महत्वाचे प्रकल्प सुरु करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच कोरोना काळातही अनेक महत्वपूर्ण कामात ते सहभागी होते. कोरोनाच्या उपचारांसाठी एनएससीआय येथे उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी आणि रेस्को येथे तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. याठिकाणी वेळोवेळी  भियांत्रिकी विषयक विविध बाबींची पूर्तता करण्‍यातही त्यांचा पुढाकार होता.

संचारबंदीच्या काळात मुंबई शहराला अविरत पाणीपुरवठा करण्‍याची जबाबदारी त्‍यांच्‍यावर असताना मनुष्यबळाचे आव्हान असूनदेखील त्यांनी ही जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली होती. पाणीपुरवठा प्रकल्‍पांपैकी, मध्‍य वैतरणा प्रकल्‍पांतर्गत असणा-या भांडुप जलाशय, भांडुप जलप्रक्रि‍या केंद्र, उदंचन केंद्र प्रकल्‍प यासारखे अनेक प्रकल्‍प यशस्‍वीपणे राबविण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा होता. गुंदवली ते भांडुप संकुलापर्यंतचा तब्‍बल १५ किलोमीटर लांबीचा जलबोगदा करण्‍यात आणि गारगाई प्रकल्‍पाला गती देण्‍यात त्‍यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment