हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. त्याच्या या टीकेनंतर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी शिवसेना आणि ‘एमआयएम’वर निशाणा साधला आहे. “भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. एमआयएमने महाविकास आघाडीसोबत नक्की जावे. कारण ते शेवटी एकच आहेत. सत्तेसाठी ते काय काय करतात पाहू. आता शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेले आहे,” अशी टीका फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, पाच पैकी चार राज्याच्या निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे विरोधकांकडून आता महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आता एमआयएमने भाजप विरोधात जाय महाविकास आघाडी सरकारसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. ते कसे शिवसेनेसोबत जातात ते आम्ही पाहूच.
देशात अजूनही लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. हे लोक एकत्र आले तरी त्याचा भाजपवर काहीही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. हे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.