हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अनेक कारणांवरून गोंधळ घेतला जाणार आहार. खास करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांना ठणकावले आहे. “विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामाआम्ही घेणार नाही म्हणजे नाहीच, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.
मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपकडून सध्या अनेक कारणांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे, ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.