हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांचे विचारच माहीत नाहीत, आणि ज्यांना विचार माहिती आहेत त्यांना ते आचरणात आणता येत नाहीत. डॉ नरेंद्र दाभोळकरांसारख्या बुद्धिवादी समाजसेवकाचा खून होऊनही जो समाज गेली ७ वर्षं झोपलेल्या अवस्थेत आहे, त्याला पुरोगामी कसं म्हणायचं? हा सवाल पत्रकार निखील वागळे यांनी उपस्थित केला. स्पष्ट शब्दांत सांगायचं झालं तर महाराष्ट्र हा ढोंगी असल्याचं मत निखील वागळे यांनी व्यक्त केलं. पत्रकार अलका धुपकर यांच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊन गप्पा या कार्यक्रमात निखील वागळे यांनी दर्शकांशी संवाद साधला.
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट २०२० रोजी ७ वर्षं पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने खुनाचा तपास, सद्यस्थितीत माध्यमांमध्ये चाललेल्या गोष्टी, राजकारण याविषयी वागळे यांना प्रश्न विचारण्यात आले. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्याकडे असलेल्या संघटन कौशल्य आणि अभ्यासू वृत्तीची माहिती देताना लोकशाही आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी करणारा संयमी नेता असं वर्णन वागळेंनी केलं. यशवंतराव चव्हाणांनी जे बेरजेचं गणित राजकारणात केलं तेच गणित नरेंद्र दाभोलकरांनी सामाजिक कार्यात केलं. विविध क्षेत्रांतील माणसांना हेरुन त्यांना जोडलेलं ठेवण्याची कला दाभोळकरांकडे होती. म्हणूनच त्यांनी उभं केलेलं काम त्यांच्या मृत्यूनंतरही अखंडपणे सुरु आहे, आणि हे अभूतपूर्व आहे असं वागळे पुढे बोलताना म्हणाले. श्रीराम लागू, निळू फुले यांच्यासोबतच्या आठवणींना वागळे यांनी यावेळी उजाळा दिला.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू आणि सीबीआय तपासासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना निखील वागळे म्हणाले, “अशा प्रकरणात खुनी सापडतो, मात्र त्याचे सूत्रधार शोधण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते ती कुठलंही सरकार किंवा तपास यंत्रणा दाखवत नाही. विचारवंतांच्या हत्येचे प्रलंबित पडलेले प्रश्न ही याचीच साक्ष देतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना डॉ दाभोळकरांचा खून झाला. यंदाच्या २० ऑगस्टच्या कार्यक्रमात तेच प्रमुख पाहुणे आहेत. त्यांनाही या कार्यक्रमात डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना तुम्ही का पकडू शकला नाहीत हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे.
टीव्ही चॅनेलवर सध्या निखील वागळे दिसत नाहीत, ते कधी दिसतील या प्रश्नावर उत्तर देताना – जो संपादक मला माझ्या कामात अडथळा न आणता काम करु देईल, तो भेटला की मी पुन्हा टीव्हीवर दिसेन असं वागळे म्हणाले. आयबीएनमध्ये असताना राजदीप सरदेसाई यांनी ते स्वातंत्र्य दिलं, मी मराठीमध्ये असताना रवींद्र आंबेकरांनी त्या प्रकारची मदत मला केली, पण मला काढण्यासाठी ज्यावेळी त्यांच्यावर दबाव आला त्यावेळी मी स्वतःहुनच थांबण्याचा निर्णय घेतला असं वागळे म्हणाले.
पत्रकारितेत काम करण्यासाठी युवकांना धडपडावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील असा संदेशही त्यांनी शेवटी दिला.
अलका धुपकर यांनी निखील वागळे यांची घेतलेली संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी –
https://www.instagram.com/tv/CEEiSs2Jnz1/?igshid=113hwbsv095vq
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.