हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर येत्या शुक्रवारी (दि. १७ नोव्हेंबर) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. यानिमित्ताने बऱ्याच वर्षानंतर शिवाजी स्टेडियमवर उच्चांकी गर्दी पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांच्या सभांची गर्दी अनुभवली आहे. या दिग्गजांच्या सभांच्या गर्दीचा उच्चांक जरांगे-पाटील मोडणार का? याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर यापुर्वी दिग्गज राजकीय नेत्यांच्या सभा लोकांनी पाहायल्या आहेत. त्या सभा कशा झाल्या होत्या? अंदाजे किती लोकं सभांना उपस्थित होती, हे जाणून घेण्यासाठी त्या सभांचे साक्षीदार असलेल्या ॲड. एम. टी. देसाई यांच्याशी ‘हॅलो महाराष्ट्र‘ने संवाद साधला.
शिवाजी स्टेडियमवर झालेल्या दिगज यांच्या सभांविषयी बोलताना ॲड. देसाई म्हणाले की, 1985 मध्ये शिवाजी स्टेडियमवर रात्री एक वाजता शरद पवार यांची सभा झाली होती. रात्रीचे एक वाजले असतानाही 70 ते 80 हजार लोक सभेला उपस्थित होते. शरद पवार हे त्यावेळी समाजवादी काँग्रेसमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सभांचा धडाका लावला होता. त्यावेळी लोकांचाही त्यांना मोठा प्रतिसाद पाहायला मिळत होता.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/740410934790946/?mibextid=Zujteh
महाराष्ट्रात 1995 ला पहिल्यांदा युती सरकार सत्तेवर आले. त्यानंतर 96 मध्ये लोकसभा निवडणूक लागली. सहकार महर्षी जयवंतराव भोसले हे शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्टेडियमवर सभा घेतली होती. ती सभा देखील उच्चांकी गर्दीत झाली होती. खास ठाकरे शैलीत बाळासाहेबांनी भाषण केले होते. बाळासाहेबांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते, अशी आठवण ॲड. देसाई यांनी सांगितली.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले होते. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील शिवाजी स्टेडियम वरील सभेला उपस्थित होते. भर दुपारी कडाक्याच्या उन्हात सभा असतानाही लाखावर लोक सोनिया गांधींच्या सभेला उपस्थित होते, अशी माहिती ॲड. एम. टी. देसाई यांनी दिली.
जरांगे पाटलांची सभा उच्चांकी होईल…
सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांच्या सभांना होत असलेली गर्दी पाहता शिवाजी स्टेडियमवरील सभा देखील उच्चांकी होईल, असा अंदाज ॲड. देसाई यांनी वर्तवला आहे. बाळासाहेब ठाकरे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या सभांना झालेल्या गर्दीची मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेतील गर्दीशी नक्कीच तुलना होणार आहे. त्यामुळे स्टेडियमवर होणाऱ्या सगळीकडे सर्वांचे लक्ष लागून राहील, असे ॲड. देसाई म्हणाले.