हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची मुंबईतील वरळी येथे आज महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, माजी मंत्री आ. सुभाष देसाई उपस्थित होते. सुमारे दोन तास पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली.
येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत खासदार शरद पवार यांनी महत्वाची बैठक घेत अनेक मुद्यांवर चर्चा केली. यावेळी मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच बैठकीच्या अनुषंगाने प्रत्येकाकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
यावेळी मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या नियोजन बैठकीस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, आ. रोहित पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. राजेश टोपे, खा. अनिल देसाई आदी प्रमुख नेत्यांनी देखील उपस्थिती लावली होती.
महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आले एकत्र; 'या' विषयावर केली महत्वाची चर्चा pic.twitter.com/9riWHR5ygZ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 5, 2023
दरम्यान, मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पत्रकार परिषद घेत आगामी काळात मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चर्चेबाबत माहिती देण्यात आली.