सांगली प्रतिनिधी | आगामी राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादीकडून सांगली जिल्ह्यातून माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांची निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून सांगली जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावेळी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नावाची प्राधान्याने जोरदार चर्चा सुरू आहे. सदाशिवराव पाटील यांचे वडील लोकनेते हणमंतराव पाटील हे शरद पवार यांचे जवळचे सहकारी होते. त्यांनी पवार यांच्या भूमिकेची सातत्याने पाठराखण केली होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सदाशिवराव पाटील यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र कालांतराने जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार ते कॉंग्रेसमध्ये गेले.
13 फेब्रुवारी रोजी सांगलीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीररित्या प्रवेश करून आगामी राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे. पक्षप्रवेशावेळीच सदाभाऊंना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महत्वाचे आणि मानाचे पद मिळण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत होते. त्यांचे समर्थक तसे सांगत होते. पण, अद्याप तरी तशी संधी मिळालेली नाही. परंतु ती संधी आगामी विधानपरिषद सदस्यांच्या नेमणुका होताना मिळेल, असा विश्र्वास त्यांच्या समर्थकातून व्यक्त होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.