मराठवाड्यात 26 हजारांवर सक्रिय रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे २६ हजार सक्रीय रुग्ण, तर सव्वालाखापेक्षा जास्त व्यक्ती अलगीकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आतापर्यंत विभागातील बाधितांची संख्या ही दोन लाखांवर गेली आहे आणि पावणेदोन लाखांवरील बाधित हे कोरोनामुक्त झाले असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये रविवारी ३,९१६ नवे बाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १४३२ बाधित हे औरंगाबाद जिल्ह्यात, तर नांदेड जिल्ह्यात ९२३ व जालना जिल्ह्यात ५६२ बाधित आढळून आले. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ही २ लाख ५ हजार ७६० झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ६७ हजार ३५४ बाधितांची संख्या ही औरंगाबाद जिल्ह्याची आहे व सर्वांत कमी ५ हजार २९८ बाधितांची संख्या ही हिंगोली जिल्ह्याची आहे. विभागामध्ये आतापर्यंत १ लाख ७५ हजार ३७९ बाधित हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्येही औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या सर्वाधिक व हिंगोली जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या सर्वांत कमी आहे. विभागात आतापर्यंत ४ हजार ९४२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातही सर्वाधिक १४२० मृत्यू हे औरंगाबाद जिल्ह्यात व सर्वांत कमी ७४ मृत्यू हे हिंगोली जिल्ह्यातील आहे. नांदेड जिल्ह्यामध्येही ७३५ मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. संपूर्ण विभागात रविवारी एकाच दिवशी २७ मृत्यू झाले आणि त्यामध्ये सर्वाधिक ११ मृत्यूची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात, तर लातुरात एकही मृत्यू झालेला नाही. विभागातील मृत्यू दर १.४० (हिंगोली जिल्हा) ते ३.२७ (परभणी जिल्हा) टक्के, तर रिकव्हरी रेट हा ८०.२९ (नांदेड जिल्हा) ते ९१.९४ (लातूर जिल्हा) टक्के आहे.

औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट ३४ टक्के
मराठवाडा विभागामध्ये रविवारी एकाच दिवसांत १८ हजार ३४० चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ४४५५ चाचण्या होऊन त्यामध्ये ९२३ पॉझिटिव्ह आढळले, तर ३५३२ निगेटिव्ह आढळले. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात ४२२२ चाचण्या होऊन त्यामध्ये १४३२ पॉझिटिव्ह व २७९० निगेटिव्ह आढळले. तसेच जालना जिल्ह्यात ३२०६ चाचण्या होऊन ५६२ पॉझिटिव्ह व १८६५ निगेटिव्ह आढळले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३३.९१ टक्के, नांदेड जिल्ह्याचा २०.७१ टक्के व जालना जिल्ह्याचा १७.५२ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group