Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2766

छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे औरंगाबादेत अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण औरंगाबाद येथे होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील क्रांती चौकात शिवरायांचे पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून क्रांती चौकातील या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी शिवप्रेमींची प्रतीक्षा सुरु होती. जानेवारी महिन्यात औरंगाबाद शहरात हा पुतळा दाखल झाल्यानंतर कधी एकदा महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं दर्शन होईल, याची वाट प्रत्येक औरंगाबादकर पहात होता. पुतळ्याचे अनावरण कधी करायचे, याबद्दल अनेक दिवस निर्णय होऊ शकला नाही. अखेर 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने रात्री दहा वाजता या पुतळ्याचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे.

अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्षात उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता औरंगाबादेत येतील. साडेदहा वाजता क्रांती चौकात पोहोचतील.

पर्यटन राजधानीसाठी सरकारचा 500 कोटींचा निधी

औरंगाबाद – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने 500 कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली.

औरंगाबाद साठी किमान 500 कोटींचा निधी मिळावा यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 3 जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 21 जानेवारीच्या नियोजन विभागाच्या बैठकीत खो दिला होता.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत पालकमंत्री देसाई यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने 500 कोटींचा प्रारुप आराखडा सादर केला होता. परंतु कोवीड, महसुलात घट इत्यादींमुळे 70 कोटी अधिक देत 385 कोटींच्या प्रारुप आराखड्यास अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली होती.

“किरीट सोमय्यांकडून अर्णबला वाचविण्यासाठी अन्वय नाईकला धमक्या”; संजय राऊतांच्या गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. त्यांच्याकडून तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या पागल झाले आहेत. त्यांना स्वप्नातही बंगले दिसतात. अन्वय नाईकला किरीट सोमय्या यांनी धमक्या दिल्या असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एक मराठी उद्योजक असलेल्या अन्वय नाईकला भाजप नेत्यांनी धमक्या दिल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईकला दोनवेळा बोलावून धमक्या दिल्या आहेत. त्या केवळ अर्णब गोस्वामीला वाचवण्यासाठी. भाजपच्या दबावामुळे अन्वयने आत्महत्या केली.

किरीट सोमय्या हे पागल झाले आहेत. त्यांना वेड लागले आहे. त्यांना स्वप्नातही बंगले दिसतात. ते नक्कीच जेलमध्ये जाणार आहरेत. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही जेलमध्ये नक्की जाणार आहेत, अशी टीका राऊत यांनी किरीट सोमय्या व भाजप नेत्यांवर केली.

नारायण राणे अडचणीत; ‘त्या’ बंगल्याप्रकरणी मुंबई महापालिकेची नोटीस

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत सापडले आहेत. मुंबई महापालिकेने राणेंच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस बजावली आहे. तसेच याबाबत पाहणी करण्यासाठी महापालिकेचं एक पथक राणेंच्या घरी जाणार आहे.

2017मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबतची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. तक्रारीत बंगल्याचे बांधकाम सीआरझेडचे उल्लंघन करुन केल्याचे म्हटले होते. मुंबई महापालिका कायदा, १८८८ च्या कलम ४८८ अंतर्गत नोटीस पाठवली आहे.

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंगल्याची तपासणी केल्यानंतर, अनधिकृत बांधकाम आढळल्यास, बंगल्याची वैधता सिद्ध करण्यासाठी त्यांना आणखी एक नोटीस बजावली जाईल. तसेच कायदेशीर कागदपत्रे प्रदान करण्यात त्यांनी अपयशी ठरल्यास, पाडण्याची कारवाई केली जाईल.

अधिश बंगला गेल्या काही वर्षांपासून वादात आहे. सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बंगल्याचं बांधकाम झाल्याचं अधिकाऱ्यांनी य सांगितलं. हा बंगला समुद्र किनाऱ्यापासून ५० मीटरवर आहे. त्यामुळे सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं अधिकारी म्हणाले.

‘त्या’ स्त्री-पुरुषाचा होरपळूनच झाला मृत्यू

औरंगाबाद – गांधीली शिवारातील उभ्या कारमध्ये स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. पण या दोघांचे काय संबंध होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

16 फेब्रुवारी रोजी कारमधील एसीच्या स्फोटात रोहिदास गंगाधर आहेर, शालिनी सुखदेव वानखेडे यांचा मृत्यू झाला होता. रोहिदास हे बांधकाम व्यावसायिकाकडे चालक होते. शालिनी या धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होत्या. रोहिदास यांच्या पश्चात पत्नी तीन मुली असा परिवार आहे. त्यापैकी दोन मुली विवाहित आहेत. शालिनी यांना दोन मुली, दोन मुले आहेत. दोन्ही मुलींचे विवाह झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे कुटुंबीय एकमेकांना ओळखत नाही.

एसीच्या स्फोटाची कारणे शोधण्यासाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, आरटीओ व संबंधित कंपनीला पत्र देवून तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. मृतांचे चेहरे, हातपाय होरपळले आहेत. मात्र गाडीचा थोडा भागत जळाला. मागचे सीट सुरक्षित आहे त्यामुळे दोघांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.

“मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे 19 बंगलो चोरीला गेले”; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

thackeray somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून 18 बंगल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “देव पण चूक करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे 19 बंगलो चोरीला गेले,” असे सोमय्या यांनी म्हंटले.

आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले आहेत. त्यांच्याकडून त्या ठिकाणी जाऊन तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. त्यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे. ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतो.

ज्या सरपंचाने मे 2019 महिन्याच्या सभेत, रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 ला अर्ज केला, जमीन माझ्या नावावर झाली, घरं माझ्या नावावर करा असं पत्र लिहिलं. मे 2019 मध्ये याच सरपंचानी तो प्रस्ताव मंजूर केला. ती घरे जून महिन्यात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर ती जमीन करण्यात आली. महाराष्ट्राच्या जनतेला घरं आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

कोल्हापूर, अमरावती आणि पुण्यात दगड मारण्यात आला. पुण्यात तिथं हजारो नागरिकांनी सत्कार केला होता. आम्हाला अडवलं तरी कुणीही दंगल करणार नाही, प्रशासनानं अडवलं तरी पुन्हा त्यावेळी जाईन. मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, अशी तोफ सोमय्यांनी डागली.

विरोधकांचा धुव्वा : सुपने विकास सेवा सोसायटीत उंडाळकर गटाचा 13/0 ने विजय

कराड | सुपने (ता. कराड) येथील विकास सेवा सोसायटी अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचे नेतृत्व मानणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या सुपने विकास पॅनेलने एकहाती 13-0 अशी सत्ता अबाधीत ठेवली आहे. तर विरोधी संत नावजी महाराज पॅनेलचा धुव्वा उडविला.

सुपने विकास सेवा सोसायटीत विजयी उमेदवार व त्यांची मते कंसात पुढीलप्रमाणे 

सर्वसाधारण गटातून ः दिपक (प्रकाश) आकाराम पाटील (259), केदार निवृत्ती पाटील (241), बजरंग प्रताप पाटील (251), महादेव भिमराव पाटील (239), राजेंद्र निवृत्ती पाटील (238), विक्रमसिंह एकनाथ पाटील (237), संतोष जयसिंग पाटील (234), हिंदुराव अनंत पाटील (234). महिला राखीव गटातून ः उषा हणमंत जाधव (256), रोहीणी सुरेंद्रकुमार शिंदे (259). इतरमागास प्रवर्ग राखीव गटातून ः भरत बाळकृष्ण माळी (258), अनुसूचित जाती-जमाती राखीव गटातून ः जयप्रकाश अरूण बामणे (260). विमुक्त जाती-जमाती- विशेष मागास राखीव गटातून ः दादाराम सिताराम जाधव (258)

कराड तालुक्यातील सुपने गावात विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर प्रकाश पाटील यांच्या विरोधात गावातील सर्व स्थानिक नेत्यांनी एकत्र येत आव्हान दिले होते. तसेच आरोप- प्रत्यारोप करत निवडणूकीत रंगत आणलेली होती. प्रकाश पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते, तरीही मतदारांनी विरोधकांचा धुव्वा उडवित सुपने विकास पॅनेलला एकहाती मोठ्या फरकाने विजयी मिळविला. त्यानंतर विजयी पॅनेलने सुपने गावातून जल्लोष करत विजयी रॅली व फटाक्याची अतिषबाजी केली. विरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे समर्थकांसह अन्यही गट एकत्रित होते. विरोधी पॅनेलचे पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील, राहूल पाटील, बलराज पाटील, महेंद्र पाटील, जी. आर. पाटील, सतिश पानुगडे यांच्या नेतृत्वातील संत नावजी महाराज ग्रामविकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा 70 ते 107 मतांनी पराभव झाला आहे.

देशातील सर्वात उंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण

Shivaji Maharaj

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फूट उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण केले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असून यासह पुतळ्याची उंची 52 फूट आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवडाभरापासून राजकीय वादंग उभे राहिले असले, तरी रात्री 12 वाजेपर्यंत अनावरणाचा सोहळा चालणार आहे.

या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहील. आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील येतील असे मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

12 वाजेपर्यंत परवानगी –
सोहळ्यासाठी वाद्य आणि साउंडला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली. मनपाने चव्हाण यांच्याकडे परवानगीसाठी विनंती केली होती. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विशेष अधिकारातील तीन दिवसांपैकी 18 फेब्रुवारीला पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान परवानगी दिली आहे.

रस्त्यात उभ्या ट्रॅक्टर ट्राॅलीला दुचाकीची धडक, युवक जागीच ठार

पुसेसावळी : – कडेगाव तालुक्यातील नेवरी जवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टर ट्राॅलीला मोटरसायकल चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात खटाव तालुक्यातील मोटरसायकल स्वार ठार झाला असल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक घटनास्थळी वरून मिळालेली माहिती अशी, विटा (ता.खानापूर) येथील सुळेवाडी पाटबंधारे विभागात कार्यरत असलेले वैभव गुरव (वय- 25, रा पुसेसावळी, ता. खटाव) हे त्याच्या मालकीच्या हिरो होंडा सीडी डॉन मोटरसायकल वरून आपले काम संपून घरी जात होते. दरम्यान, नेवरी (ता. कडेगाव) येथील एस टी थांबा जवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टर टॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली.

दुचाकीची धडक इतकी जोराची होतो की गुरव याच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्याच्या कानातून व तोंडून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर टॉलीने घटनास्थळावरून पलायन केले या अपघाताची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

भारतीय शेअर बाजारात कोणत्या शेअर्समध्ये आणि किती गुंतवले जातात LIC चे पैसे

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेली लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC (Life Insurance Corporation of India) IPO आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने IPO साठी प्रारंभिक कागदपत्रे देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे सादर केली आहेत. IPO साठी दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP च्या मसुद्यानुसार, सरकार आपला 5 टक्के हिस्सा इक्विटी शेअर्सद्वारे विकणार आहे.

14 फेब्रुवारी 2022 पर्यंत BSE वर सूचीबद्ध केलेल्या 5,249 शेयर्सपैकी 255.4 लाख कोटी रुपयांच्या एकूण मार्केट कॅपपैकी 3.7 टक्के (रु. 9.4 लाख कोटी) LIC ची मालकी आहे, ब्रोकरेज व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या डेटानुसार, जे विविध कंपन्यांमधील त्यांचे स्टेक आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये LIC चा 6.13 टक्के हिस्सा
रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) देखील LIC मधील मोठ्या भागभांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे, ज्यामध्ये LIC ची डिसेंबर 2021 पर्यंत 6.13 टक्के भागीदारी होती. याशिवाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय, आयटीसी, आयसीआयसीआय बँकेतही LIC ची महत्त्वपूर्ण भागीदारी आहे.

‘या’ कंपन्यांमध्ये LIC ची 10 टक्क्यांहून अधिकची भागीदारी 
ITC, हिंदुस्तान कॉपर, NMDC, MTNL, लार्सन अँड टुब्रो (L&T), हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL), ऑइल इंडिया अशा काही कंपन्या आहेत ज्यात या इन्शुरन्स कंपनीची 10 टक्क्यांहून अधिकची भागीदारी आहे.

एसीसी, अंबुजा सिमेंट्स, इंडिया सिमेंट्स, भारत बिजली, सीडीएसएल, डीसीएम श्रीराम, ग्रासिम, महिंद्रा अँड महिंद्रा, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, टाटा स्टील आणि टाटा पॉवर इत्यादी कंपन्यांच्या बोर्डावर देखील LIC चे नॉमिनेटेड डायरेक्टर्स आहेत.