Monday, December 22, 2025
Home Blog Page 2807

‘माझी आणि दानवेंची बरोबरी होणे शक्य नाही’; शिवसेनेत गटातटांचे राजकारण

ambadas danve

औरंगाबाद – शिवसेनेत शिवतेज आणि शिवसंवाद मोहिमेवरून गटातटांचे राजकारण पाहायला मिळाले. यातून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे असे दोन गट असल्याच्या चर्चेला खैरे यांनी बुधवारी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. माझी आणि आमदार दानवेंची बरोबरी होणे शक्य नाही. मी शिवसेनेच्या 13 नेत्यांपैकी एक असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले.

मागील अनेक वर्षांपासून खैरे आणि दानवे यांच्यातील संवाद दुरावला असून, कोणत्या न कोणत्या निमित्ताने गटबाजी चव्हाट्यावर येते. खैरे यांनी बुधवारी शिवसेना पक्षघटनेचा हवाला देत कोणाचे काय अस्तित्व आहे, हे स्पष्ट केले.

शिवसेनेत जातीय वादाचे राजकारण मूळ धरीत आहे. आमदार दानवे आणि खैरे असे गट पडले आहेत काय, शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांवरून तसे दिसते आहे, असे विचारता खैरे म्हणाले, माझी आणि दानवे यांची एक लेव्हल नाही. मी पक्षातील 13 नेत्यांपैकी एक आहे. पक्षघटनेतील तरतुदीनुसार ते पद आहे. नेते, उपनेते, संपर्कनेते आणि नंतर जिल्हाप्रमुख असा क्रम आहे. त्यामुळे दानवे आणि माझी बरोबरी असण्याचा प्रश्नच येत नाही.

‘सत्तार आता भगवे झाले आहेत’ –

राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि तुमचे सूर जुळले आहेत. यामागे नेमके कारण काय? यावर खैरे म्हणाले, सत्तार आता भगवे झाले आहेत. त्यांनी कार्यालयही भगवे केले आहे. पक्षप्रमुखांनी जादू केली आहे त्यांच्यावर. त्यामुळे ते भगवे झाले आहेत. जि. प., पं. स. निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

आ. महेश शिंदेचा करिष्मा : कोरेगाव सोसायटीच्या 13 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात तरीही बिनविरोध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच चुरशीने झाली. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव ग्राम सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक चुरशीने होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सोसायटीच्या 13 जागांसाठी 31 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनपेक्षितपणे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, उदयसिंह बर्गे, राजेंद्र बर्गे, गुलाबराव बर्गे, संतोष बर्गे आदींनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे 13 जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज उरल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून विठ्ठल रामचंद्र काटे, शिवलिंग विठ्ठल बर्गे, हिंदुराव दादू नांदे, नारायण रामचंद्र बर्गे, संजय प्रल्हाद बर्गे, सयाजी शिवाजीराव बर्गे, शरद विठ्ठल बर्गे, अनिल चंद्रकांत बर्गे, महिला राखीव मतदारसंघातून मालन बाळासाहेब महाडिक, सुमन धर्मराज बर्गे, इतर मागास प्रवर्गातून तानाजी लक्ष्मण नाळे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रामचंद्र अप्पासाहेब बोतालजी, विशेष मागास प्रवर्गातून सचिन हणमंत कोकरे या 13 जणांचा समावेश आहे.

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार; देशमुखांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे

deshmukh vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी अडचणीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात ईडीच्या सहाय्यक संचालकांना सचिन वाझेंनी पत्र देखील पाठवलं आहे

ईडीच्या सहाय्यक संचालकांना पाठवलेल्या पत्रात सचिन वाझे यांनी म्हटले आहे की, “मी सक्षम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर वरील प्रकरणाच्या संदर्भातील मला ज्ञात असलेल्या सर्व सत्य आणि ऐच्छिक माहिती देण्यास तयार आहे. त्यानुसार सीआरपीसी कलम ३०६, ३०७ अंतर्गत माफीचा साक्षीदार करून घेण्याची विनंती सचिन वाझे याने इडीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, कलम ३०६, ३०७ अंतर्गत माफीचा साक्षीदार करून घ्यायचे की नाही याचा अंतिम निर्णय न्यायालयाच्या कक्षेत होतो. यासाठीच साक्ष सक्षम न्यायदंडाधिकाऱ्याच्या उपस्थितीत नोंदवून घेतली जाते. नंतर साक्षीदाराला सुनावणीवेळी न्यायालयात हजर केले जाते. परंतु जर सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाले तर अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांचे थेट अमित शहांना पत्र; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे महापालिका कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. “मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट होता. याप्रकरणी आता केंद्राने जातीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीयमंत्री अमित शहा यांना पाठविल्याल्या पत्रात म्हंटले आहे की, भ्रष्टाचाराविरोधात वेगवेगळे घोटाळे बाहेर काढण्याचे काम किरीट सोमय्या करीत आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता NIA चौकशी करण्यात यावी. तसेच हल्ल्याप्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी. सोमय्या यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कमकुवत कलमी लावली आहेत. तसेच त्यांच्याकडून जाणीवपूर्वक हल्लेखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

वास्तविक पाहता सोमय्या यांच्यावरकरण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसही सामील असल्यामुळे अशा पोलिसांवर कारवाई करावी. तसेच सोमय्यांवरील हल्ल्याचा कट रचणाऱ्या महाराष्ट्र सरकारवरही कारवाई केली जावी, अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.

महामेट्रोचे पथक शहरात दाखल

Mumbai Metro

औरंगाबाद – शेंद्रा एमआयडिसी ते वाळूज पर्यंत एकच उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वे कामाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महा मेट्रोच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक काल शहरात दाखल झाले. त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून मेट्रो रेल्वे, फ्लायोवर मार्गाची माहिती घेतली.

मनपा कार्यालयात शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, उपसंचालक नगररचना ए.बी. देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर स्मार्ट सिटी च्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांची भेट घेतली.

पथकात या अधिकाऱ्यांचा समावेश –
मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या सर्वेक्षणासाठी महा मेट्रोच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. यात वरिष्ठ अतिरिक्त महाव्यवस्थापक विकास नागुलकर, सहाय्यक व्यवस्थापक साकेत केळकर, अर्बन मास ट्रान्झिट कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक शिव निरंजन, वरिष्ठ अभियंता उदय जयस्वाल यांचा समावेश आहे.

विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून धरणे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या निर्णया विरोधात तहसीलदार कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. १५ डिसेंबर २०११ रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायततेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या या बैठकीत विद्यापीठ कायद्याबाबत घेतलेले निर्णय हे गेल्या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेत कोणतीही चर्चा न करता पारित करून राज्यपालांकडे अंतिम स्वाक्षरीसाठी पाठवलेले आहे. शासनाच्या या प्रस्तावित विद्यापीठ परिषद सुधारणा कायद्यामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठाचे कुलपती असणारे राज्यपाल हे देखील कुलगुरूची थेट नियुक्ती करू शकणार नाही.

यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपाल यांना करावी लागेल, राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठाची गुणवत्ता पूर्णपणे ढासलेलं याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून हा प्रस्तावित विद्यापीठ सुधारणा कायदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी अभाविप कडून यावेळी करण्यात आली.

व्यवसायाच्या नैराश्येतून पोलिसाच्या पतीची गळफास लावून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे राहणार्‍या पोलीस महिलेच्या पतीने व्यवसायात यश येत नसल्याने आलेल्या नैराश्येतून राहत्या घराच्या लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र शहाजी पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहिली होती. ती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार व्यवसायाच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत जितेंद्र पाटील यांचा दूध संकलनाचा व्यवसाय गावामध्ये आहे. त्यांच्या पत्नी संजयनगर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत.

सध्या पाटील हे कुटुंबियांसह यशवंतनगर येथील एका घरामध्ये भाड्याने राहत होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे व्यवसायात यश मिळत नसल्याने चिंतेत होते. बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ते व्यायामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. लोखंडी जिन्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकसभेत महाराष्ट्राचा अवमान केल्याप्रकरणी मोदींविरोधात काँग्रेसची निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मिरज शहर काँग्रेस अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या उपस्थितीत मिरजेतील गांधी पुतळा, मिशन हॉस्पिटल चौक येथे निदर्शने करण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘मजुरांना मदत करणे हा जर गुन्हा असेल, तर हो, काँग्रेसने तो गुन्हा केलाय’, ‘महाराष्ट्र द्रोही भाजप, महाराष्ट्र द्रोही मोदी’, ‘नमस्ते ट्रम्प, करणारे मोदीच खरे कोरोना स्प्रेडर’, ‘शर्म करो मोदीजी’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रती थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झाली असल्याची टीका करत काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चारचाकी कार चोरणार्‍या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पर्दाफाश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

इस्लामपूर शहरातील चारचाकी कार चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केला आहे. चोरी प्रकरणातील राजू बाबूराव जावळकर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बोलेरो व चारचाकी कार हस्तगत करण्यात आली. चोरटयाचे दोघे साथीदार फरार झाले आहेत. 31 जानेवारी रोजी इस्लामपूर-आष्टा नाका परिसरातील भास्कर मोरे यांच्या माणेकश्वर मोटर गॅरेजमध्ये लावलेली बोलेरो कार ही अज्ञात चोरटयांनी चोरून नेली होती.

याबाबतची फिर्याद भास्कर मोरे यांनी इस्लामपूर पोलिसात दिली होती. पोलिसांनी इस्लामपूर शहरातील सीसीटिव्हीची सखोल माहिती घेतली. आरोपी पेठच्या दिशेने जावून पुणे जिल्हयातील खेड-शिवापूरच्या दिशेने गेल्याचे फुटेजमधून दिसून आले. तेथील रामनगर परिसरात गस्त घालताना राजू जावळकर यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने कोल्हापूर जिल्हयातील गांधीनगर, सांगली व सातारा शहरातून साथीदार नितीन शामराव समुद्रे, अंगत पुणवत यादव यांच्या मदतीने 5 गुन्हयांची कबूली दिली.

राजू जावळकर यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. फरार आरोपी नितीन समुद्रे व अंगत यादव यांचा कसून तपास सुरू आहे. या टोळीकडून राज्यातील आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.

मला जीवे मारण्याचा कट उद्धव ठाकरे व संजय राऊत, गुप्तांच्या संगनमतीने; सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे महापालिका कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संगनमत करुन जीव घेण्याचा कट रचला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत आणि त्यांच्या कंपनीला उद्धव ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात कंत्राटे दिली. त्याचा घोटाळा मी वारंवार बाहेर काडू लागलो त्यामुळेच माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मदतीने संगनमत करून हा कट रचला आहे.उद्धव ठाकरे सरकारनेच संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्यांना कंत्राट दिले आहे. कोविड घोटाळे पीएमआरडीएने पुणे महापालिकेने नाकरलेल्या लोकांना कंत्राट दिली गेली, असल्याची माहिती यावेळी मनोज कोटक यांनी दिली.