Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2815

डिजिटल इंडियामध्ये ई-वॉलेट आणि UPI मुळे लोकांची ट्रान्सझॅक्शन करण्याची पद्धत बदलली

UPI

नवी दिल्ली । देशात डिजिटायझेशनला चालना मिळाल्याने रोख रकमेऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआयचा वापर वाढला आहे. यामुळे लोकांना आर्थिक सेवा मिळणे तर सोपे झाले आहेच, मात्र त्याबरोबरच त्यांच्या आर्थिक वर्तनातही बदल झाला आहे. ते आता रोख रकमेऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआय वापरत आहेत.

NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणतात की,”फिनटेक कंपन्यांच्या येण्यामुळे आर्थिक समावेशन झाले आहे. म्हणजेच वित्तीय सेवांचा आणखी विस्तार झाला आहे. डिजिटल ट्रान्सझॅक्शनमध्ये वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेतील रोख रकमेची हालचाल कमी झाली आहे.”

भारत डिजिटल पेमेंटमध्ये वेगाने समृद्ध होईल
NITI आयोगाच्या फिनटेक ओपन समिटमध्ये बोलताना राजीव म्हणाले की,”अधिक न्याय्य, समृद्ध आणि आर्थिक समावेशक भारत निर्माण करण्यासाठी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. भारतात डिजिटायझेशन वाढत आहे आणि लोकांना आर्थिक सेवा सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारात बदल झाला आहे. आता ते रोख रकमेऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआयचा वापर करत आहेत.”

UPI सारखे प्लॅटफॉर्म निर्माण करण्यावर सरकारचा विश्वास आहे
या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की,” सरकार आरोग्य, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रांसाठी COVIN आणि UPI सारखे खुले प्लॅटफॉर्म तयार करण्यावर विश्वास ठेवते.” वैष्णव पुढे म्हणाले की,”सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे एक खुले प्लॅटफॉर्म तयार केले गेले आहे, ज्याद्वारे अनेक खाजगी उद्योजक, स्टार्टअप आणि डेव्हलपर्स एकत्र येऊन नाविन्यपूर्ण उपाय तयार करू शकतात.”

डबल डेकर बसची औरंगाबादकरांना प्रतीक्षाच

bus

औरंगाबाद – शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डबल डेकर इलेक्ट्रिक शहर बस सुरू करण्याची सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली आहे. त्यासाठी बेस्टची मदत घ्या, असेही ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन डबल डेकर बसची पाहणी केली. बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, तब्बल दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगण्यात आले. यासंदर्भात लवकरच निविदा काढली जाणार आहे.

शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा, यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहर बसच्या ताफ्यात पाच इलेक्ट्रिक शहर बसची भर पडणार आहे. दरम्यान पाच इलेक्ट्रिक कार स्मार्ट सिटीने खरेदी केल्या आहेत. या निर्णयाचे आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या दौऱ्यात कौतुक केले होते. तसेच शहरात पर्यटन वाढीसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याची तयारी सुरू केली. मुंबईत बेस्टने इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी केल्या आहेत. तसेच 900 बस खरेदीसाठी निविदा काढली आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी स्मार्ट सिटीचे पथक नुकतेच मुंबई येथे जाऊन आले. ज्या कंपनीकडून या बसेस खरेदी केल्या जाणार आहेत, त्या कंपनीकडे दीड वर्षाची वेटींग आहे, अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या संदर्भात उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् यांनी सांगितले, की मुंबई महापालिकेला इलेक्ट्रिक डबलडेकर बसेससाठी नऊ महिन्याचे वेटिंग आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीला 20 इलेक्ट्रिक बस खरेदी करायच्या आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटीने निविदा काढण्याची तयारी केली आहे. पण तब्बल दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 20 डबल डेकर बसेससाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर जो दर येईल, त्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण या बसची किंमत जास्त आहे.

आता PM किसानचा पुढचा हप्ता लवकरच मिळणार, ताबडतोब करा ‘हे’ काम नाहीतर तुमचे ₹ 2000 अडकतील

PM Kisan

नवी दिल्ली । पीएम किसानच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल तर ते आत्ताच करा. अन्यथा तुमचा 11 वा हप्ता अडकेल. केंद्र सरकारने आता ई-केवायसी अनिवार्य केले आहे. 1 जानेवारी रोजी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले आहेत. आता 10वा हप्ता मिळालेले शेतकरी 11व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचा 11 वा हप्ता मिळणार नाही.

पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की,” आधार आधारित ओटीपी ऑथेंटिफिकेशनसाठी शेतकऱ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशनसाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरबसल्याही करू शकता.

ई-केवायसी ऑनलाइन कसे करायचे ते जाणून घ्या
यासाठी सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका
जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण केले जाईल अन्यथा Invalid असे लिहिले जाईल.
जर Invalid लिहिले गेले तर तुमचा 10 वा हप्ता थांबू शकतो.
आता तुम्हाला आधार सेवा केंद्रात जाऊन ते दुरुस्त करून घ्यावे लागेल.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया
या योजनेत रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा तलाठी ऑफिस किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे देखील अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतःचे रजिस्ट्रेशन देखील करू शकता.

तुम्ही याप्रमाणे रजिस्ट्रेशन करू शकता
>> तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

‘या’ 7 ठिकाणी गुंतवणूक करून वाचवता येऊ शकेल 1.50 लाखांपर्यंतचा टॅक्स, अधिक तपशील जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. यानंतर नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच 2022-23 सुरू होईल. यानंतर टॅक्स आणि इतर अनेक गोष्टी बदलतील. चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तुमच्याकडे टॅक्स वाचवण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे.

जास्तीत जास्त टॅक्स वाचवण्याचे सर्व मार्ग तुम्ही अद्याप अवलंबले नसतील तर हे काम लवकरात लवकर करणे केव्हाही चांगले. वेळ जास्त असेल तर सर्व पर्यायांचा शोध घेण्याची व्याप्ती वाढते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत अनेक पर्याय आहेत, जिथे तुम्ही गुंतवणूक करून जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांपर्यंत टॅक्स वाचवू शकता. तुम्ही ज्याद्वारे टॅक्स वाचवू शकता असे 7 मार्ग खाली दिले आहेत…

पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड : टॅक्स वाचवण्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF) हे सर्वोत्तम सरकारी गुंतवणूक साधन आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्यावर सध्या वार्षिक 7.10 टक्के व्याज मिळते.

नॅशनल पेन्शन स्कीम : नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) सरकारद्वारे चालवला जाणारा रिटायरमेंट सेव्हिंग प्लॅन आहे. 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख आणि कलम 80CCD (1B) अंतर्गत जास्तीत जास्त 50 हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजना : जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तिच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये गुंतवणूक करू शकता. व्याज दर वार्षिक 7.6 टक्के आहे. यामध्ये कर कपातीचा लाभही मिळतो.

सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम : ज्येष्ठ नागरिकांसाठी, तुम्ही बँका आणि पोस्ट ऑफिसमधून या बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये 7.4 टक्के वार्षिक दराने व्याज उपलब्ध आहे. यामध्ये गुंतवणुकीला 80C अंतर्गत सूट देण्यात आली आहे.

इन्शुरन्स प्रॉडक्ट्स : युनिट लिंक्ड विमा योजना (ULIPs) आणि पारंपारिक इन्शुरन्स प्लॅन्सना प्रीमियमवर टॅक्स सूट मिळते. ULIP प्रीमियमची रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास टॅक्स सूट उपलब्ध नाही.

टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट : तुम्ही टॅक्स सेव्हिंग FD द्वारे टॅक्स सूट मिळवू शकता. मात्र हा फारसा चांगला पर्याय नाही कारण तो दरवर्षी 5 टक्क्यांपेक्षा कमी रिटर्न देतो. 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी देखील आहे.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम : ही इक्विटी म्युच्युअल फंडाची योजना आहे. यामध्ये 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक उपलब्ध आहे. वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचे रिटर्न टॅक्स फ्री आहेत आणि लॉक-इन कालावधी देखील किमान 3 वर्षांचा आहे.

श्रमिक ट्रेन राज्यांनी नव्हे केंद्राने सोडल्या, फडणवीसांचे ‘ते’ ट्विट दाखवत सुप्रिया सुळेंकडून पोलखोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप केला. त्यांच्या आरोपावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले पाच ट्विट आणि ट्रेन सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांचे आभार मानणारे केलेलं ट्विटही सुप्रिया सुळे यांनी दाखवत पोलखोल केली आहे. युपी, बिहारींना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारनेच ट्रेन सुरू केल्या होत्या. आम्ही केवळ त्यांच्या तिकीटाचे पैसे दिले. आता मोदी राज्या राज्यांत भांडणे का लावत आहात? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, काल पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राबाबत जे काही म्हंटले. ही मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट आहे. ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा. पण १८ खासदार भाजपला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत. म्हणजे, मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे,

“पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोविडच्या तिसरी लाट ओरसत आहे, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या,” असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

मोबाईल चोरीच्या संशयावरून परप्रांतीयांच्या दोन गटात फिल्मीस्टाईल राडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मोबाईल चोरीच्या संशयाने वाघवाडी फाटा परिसरातील परराज्यातून आलेल्या आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांनी पाठलाग करत उत्तरप्रदेशच्या एका तरूणाला पकडले. कोल्हापूर रस्त्यावर सकाळी 8 च्या दरम्यान दोन्ही परप्रांतियांच्यात मोबाईल चोरीवरून चांगलाच राडा झाला. छोटी मुले, महिला साहित्य डोक्यावर घेवून शास्त्रीनगरमधील एका गल्लीत अचानक आरडाओरडा करत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. आयुर्वेदीक औषध विक्रेत्याच्या कुटुंबियांनी पाठलाग करून पकडलेल्या तरूणाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पहाटे 3 च्या दरम्यान वाघवाडी फाटयावर असणाऱ्या परप्रांतीयांच्या औषध विक्री तंबूतून दोन मोबाईल चोरीला गेले. तंबूत झोपलेल्या तरूणांना मोबाईल चोरीची जाणीव झाली. काही वेळातच दोघा तरूणांनी चोरटयांचा पाठलाग केला. सकाळी औषध विक्रेत्यांनी चोरटयांचा शोध सुरूच ठेवला. तेव्हा वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्याकडेच्या माळरानावर काही लोक दिसले. तिथे जावून पाहणी केली असता दोन तरूण काही मोबाईलमधील सिमकार्ड काढत होते. हेच मोबाईल चोर असावेत म्हणून औषध विक्री करणाऱ्या तरूणाने आपल्या इतर सहकाऱ्यांना याची माहिती दिली.

तिघे-चौघेजण एकत्रित येत या तरूणांकडे विचारणा करण्यासाठी पुढे आल्यावर त्यांनी मोठया संख्येने असणारे मोबाईल घेवून पोबारा केला. तेव्हा त्या तरूणांसोबत असणारे इतर कुटुंबियही साहित्याची गाठोडी डोक्यावर घेवून सैरावैरा धावू लागले. त्यांनी इस्लामपूर शहराकडे धाव घेतली. मुख्य रस्त्यावरून हा 15 ते 20 जणांचा घोळका शास्त्रीनगर मधील छोटया कॉलनीत घुसला. तेव्हा वाघवाडी फाटयावरील औषध विक्रेत्याच्या कुटुंबियांनीही तेथे धाव घेत महिलांची गाठोडी रस्त्यावरच सोडून चोरीचा मोबाईल आहे का याची चाचपणी केली. तेव्हा महिलांनी साहित्याची ओढाओढ करत जोरदार गोंधळ केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून धाव घेत औषध विक्रेत्यांनी मोबाईल चोरीच्या संशयावरून पकडलेल्या तरूणाला पोलिस गाडीत बसवले.

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीसह जिल्ह्यात घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलेढोणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. कलेढोणे याच्याकडून घरफोडीतील ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कलेढोणे हा एकूण ९ गुन्ह्यात आरोपी असून तो गुन्हा घडल्यापासून पसार झाला होता. त्याच्या तपासणी केली असता त्याच्याजवळ एक व्हिओ कंपनीचा मोबाईल, चांदीचे दागिने, एक सॅक आणि एक कॅनन कंपनीचा कॅमेरा असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला. त्याबाबत विचारपूस करता त्याने सांगितले कि, विश्रामबाग परिसरातल्या एका घरातून सदरचा मुद्देमाल चोराला असल्याची कबुली त्याने दिली.

तसेच जयसिंगपूर येथून दुचाकी आणि पलूस येथील एक ज्वेलरी दुकान फोडून चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला ताब्यात घेत विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. छोट्या कलेढोणे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, दिलीप ढेरे, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, संतोष गळवे वैभव पाटील यांच्या पथकाने केली.

पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या घुबडाला मिळाले जीवनदान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

बुधगाव मधील ओंकार कॉलनी येथे सकाळी नऊच्या सुमारास पतंगाच्या मांज्यामध्ये घुबड अडकले असून इतर पक्षी मागे लागले आहेत अशी माहिती स्थानिक नागरिक स्वप्नील गडगुने, एस आर जाधव यांनी फोन द्वारें पक्षी अभ्यासक शरद आपटे यांना कळवले. पक्षीतज्ञ शरद आपटे यांनी लगेचच सदर घटनेची माहिती मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांना दिली.

तात्काळ संपर्क करून जागेवर असणाऱ्या नागरिकांना फोन करून घटनेची माहिती घेतल्यानंतर मांज्याचा दोरा कापून घुबडाला खाली घेण्यात आले. नागरिकांनी सतर्क राहून हि घटना निदर्शनास आणून दिली तसेच सूचनेनुसार उशीर न करता मांजा कापून घुबडाला खाली घेतले. प्राणी मित्र संघटना वर्ल्ड रेस्कूचे जावेद, अभी धुमाळ यांच्यासह इतर सदस्यांनी जागेवर जाऊन सदर घुबडाच्या पंखात व पायात अडकलेला मांजा काडून घुबड वनविभागाकडे सुखरूप दिला.

सांगली वनविभागाचे वनरक्ष श्री जोगी यांनी ,वर्ल्ड रेस्कू च्या सदस्या कडून घुबड ताब्यात घेतले व त्याच्यावर प्राथमिक उपचार करून परत त्याच्या अधिवासात सोडत असल्याचे सांगितले. घुबडाचे प्राण वाचवण्यासाठी योगदान दिलेल्या ओंकार कॉलनीतील नागरिकांचे विषेश कौतुक वनविभागाच्या वतीने करण्यात आले.

विवाहितेची दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विटा येथील शाहूनगर येथील एका 26 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. सोनाली बिहुदेव हात्तेकर असे या आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून तिने तिची चार वर्षाची मुलगी आरोही व एक महिन्याच्या बाळाला घेऊन विहिरीत उडी टाकून आपली जीवनयात्रा संपविली. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने विटा शहरासह खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही.

विटा येथील शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा नं. 13 जवळ हात्तेकर कुटुंब भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी विवाहिता सोनाली हत्तेकर ही आपली चार वर्षाची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र सोनाली व दोन चिमुरडे कुठेही आढळून आले नाहीत.

त्यानंतर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथे राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत एका महिलेने दोन चिमुरड्यासह आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी समजली. त्यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विवाहिता सोनाली हिच्यासह तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसून आले. पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या आणि क्रेनच्या मदतीने या तिघांचे मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढून विटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.