Monday, December 22, 2025
Home Blog Page 2838

वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे यांचा घातपातच, डीएनए अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

suvarna waje

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह एका गाडीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यांचा मृत्यू हा अपघात होता कि घातपात होता हे स्पष्ट झाले नव्हते. या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. जळालेल्या गाडीत आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए अहवाल आला आहे.या अहवालात मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए सेम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केली असावी असे स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण ?
डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या सिडको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. घटनेच्या दिवशी रायगड नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. डॉ. सुवर्णा वाजे या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनासुद्धा दिली होती. पोलीस तपासात जळालेल्या गाडीचा चेसी नंबर आणि गाडी नंबर यावरुन ही गाडी डॉ. सुवर्णा वाजे यांची असल्याचं स्पष्ट झालं होते. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए चेक केला असता तो एकच असल्याचे समोर आले.

25 जानेवारी रोजी नेमकं काय घडलं होतं? डॉ सुवर्णा वाजे या गाडीतून एकट्याच गाडीतून गेल्या होत्या की त्यांच्यासोबत आणखी कोण होतं? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. जळालेल्या गाडीत आढळेला मृतदेह हा डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याने हा एक घातपात असल्याचे समजत आहे. डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुकही करण्यात आले होते.

खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून फायबर बोटीची व्यवस्था

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खिरखिंडी (ता. जावली) येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास (ता. जावली) येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्यावतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सातारा, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार जावली व गट विकास अधिकरी जावली यांनी मौजे खिरखिंडी येथे भेट दिली.

जावली तालुक्यामध्ये कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या किनारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मौजे खिरखिंडी हे गाव वसलेले आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये 7 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या 25 आहे. या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी आहे. त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मौजे अंधारी (ता. जावली) येथील हायस्कूलमध्ये जावे लागते. सह्याद्री वाघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असलेल्या खिरखिंडी, आडोशी, माडोशी, रवंदी व कुसापूर या गावातील 70 कुटुंबाचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एकसाल सागाव या ठिकाणी वन्य विभागाने केले असून त्यासाठी 242 हेक्टर जमिन संपादित केली आहे. 70 कुटुंबापैकी 6 कुटुंबांनी जमिन ताब्यात घेतली नाही. ते एकसाल सागाव या गावी जावून जमिन ताब्यात न घेता परत आले आहेत. तसेच 1 कुटुंब यांनी जमिन ताब्यात घेतली असून ते परत खिरखिंडी येथे वास्तव्यास आले आहे. अशी एकूण 7 कुटुंबातील 25 लोक खिरखिंडी येथे राहतात.

त्याच कुटुंबातील एकूण 8 मुले (4 मुले व 4 मुली) अंधारी येथील हायस्कूलला शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. त्यासाठी मौजे खिरखिंडी गावातील 4 मुले व 4 मुली यांना घरापासून ते कोयना जलाशय किनारा पर्यंत येण्यासाठी 10 मिनिटे लागतात. तेथून पुढे कोयना जलाशय ते शेंबडी मठ जलाशयातील 600 मिटर प्रवास बोटीने करावा लागतो. तेथून पुढे अंधारी येथील हायस्कूलला फळणी मार्गे पायी जाण्यासाठी साधारणत: एक तास इतका वेळ लागतो. मौजे अंधारी ता. जावली येथील हायस्कूल हे अनिवासी हायस्कूल आहे. तथापी मौजे अंधारी येथे कसाईदेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अंधारी-कास ही निवासी आश्रमशाळा असून तेथे या विद्यार्थ्यांची निवासाची सोय होऊ शकते. तरीही हे विद्यार्थी निवासी राहत नाहीत. ते घरुनच येऊन-जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने त्यांना लाईफ जॅकेट पुरविण्यात आलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी फायबर बोटीची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

नगरसेवक सुहास राजेशिर्के धावले मदतीला

सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडच्या दुर्गम भागात असणाऱ्या कोयना जलाशयातून खीरखंडी गावातील मुलींचा शिक्षणासाठी होडीतून जीवघेणा प्रवास सुरु असून या मुलींचे मागील पाच वर्षापासून हा खडतर प्रवास सुरू आहे. यासाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी लाइफ जॅकेट देऊन मुलींचा प्रवास सुखकर केला आहे. अंधारी येथील शिक्षकांनी आभार मानले असून मुलांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या मुलींना रोज सकाळी लवकर खीरखंडी गावातून कोयना जलाशयात होडी चालवून पाच किलोमीटरचा प्रवास पायी जंगलातून करावा लागत आहे.

नितेश राणे हे सुपारीबाज आमदार; शिवसेना नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे हे सुपारीबाज आमदार आहेत अशी टीका शिवसेना नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे. नितेश राणे यांनी सुपारी देऊन संतोष परब यांच्यावर हल्ला घडविल्याचे सचिन सातपुते याच्या चौकशीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील जनता यापुढच्या काळात सुपारीबाज आमदार म्हणूनच त्यांना ओळखेल असे ते म्हणाले.

नितेश राणे यांच्यावरील कारवाई हि सूडबुध्दिने करण्यात आली आहे असा आरोप भाजप कडून केला जात आहे यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. या सर्व प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नाही किंवा ठाकरे-राणे वादाचा संबंध नाही, राणे यांची पोलीस कोठडीत रवानगी व्हावी अशी जनतेची भावना होती. ती न्यायालयाच्या आदेशाने पूर्ण झाली आहे.असे ते म्हणाले

जिल्हा बँकेच्या निकालानंतर नितेश राणे यांनी ट्विटरवर सतीश सावंत यांचा फोटो पोस्ट करत गाडला असे कॅप्शन वापरले होते त्याचाही सावंत यांनी समाचार घेतला. जिल्हा बँकेच्या निकालानंतर माझी सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली. माझी जिरवल्याची व्यंगचित्रे पोस्ट केली होती. माझी जिरवताना आमदार नितेश राणेंना काल तुरुंगात रात्र काढल्यानंतर त्यांचीच कशी जिरली हे समजले असेल असे ते म्हणाले

30 टक्के टॅक्सनंतर आता क्रिप्टोकरन्सीवर 28 टक्के GST भरावा लागणार? असे का ते जाणून घ्या

Online fraud

नवी दिल्ली । केंद्र सरकारने अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीवर टॅक्स जाहीर केला आहे. आता तो वस्तू आणि सेवा कराच्या (GST) कक्षेत येण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, सरकारने घोडदौड आणि लॉटरीच्या श्रेणीत क्रिप्टोकरन्सी ठेवल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. सध्या खासगी लॉटरी आणि घोड्यांच्या शर्यतींवर 28 टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे सरकार क्रिप्टोकरन्सीवर देखील 28 टक्के जीएसटी आकारू शकते. मात्र, जीएसटीबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.

सरकारने क्रिप्टोला मालमत्ता मानून 30 टक्के इन्कम टॅक्स लावला आहे. क्रिप्टोची व्याख्या व्हर्चुअल डिजिटल मालमत्ता म्हणून केली जाते. यामध्ये क्रिप्टोला ना सुरक्षा म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे आणि ना रुपयाला मान्यता देण्यात आली आहे. याला सिक्युरिटीजचा दर्जा न दिल्यास क्रिप्टोच्या खरेदी-विक्रीवरही जीएसटी लागू होईल, यात शंका नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या कायद्यांमुळे जीएसटीचा मार्ग मोकळा होत आहे
इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 अन्वये, कोणत्याही स्त्रोताकडून मिळालेले उत्पन्न, ज्याचा उल्लेख करपात्र श्रेणीमध्ये केला गेला नाही, तो इन्कम टॅक्स आकारण्यायोग्य आहे. त्याच वेळी, जर कोणत्याही सेवेच्या पुरवठ्यावर विशेष सूट दिली गेली नसेल, तर त्यावर जीएसटी लागू होईल. क्रिप्टोकरन्सीसाठी अशी सूट नसल्यामुळे, ते जीएसटी अंतर्गत देखील येऊ शकते.

GST च्या कलम 2(75) नुसार, पैसा म्हणजे भारतीय कायदेशीर चलन किंवा FEMA कायद्यांतर्गत समाविष्ट असलेले विदेशी चलन. बहुतेक व्हर्चुअल करन्सीज या व्याख्येखाली येत नाहीत. त्यामुळे ते पैसा मानता येणार नाही.

Securities Contracts (Regulation) Act, 1956 च्या कलम 2 मध्ये असे नमूद केले आहे की, सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स, स्क्रिप्स, स्टॉक, बॉण्ड्स, डिबेंचर, डिबेंचर स्टॉक किंवा तत्सम स्वरूपाचे इतर मार्केटेबल सिक्युरिटीज कोणत्याही नियमित कंपनी किंवा इतर संस्था कॉर्पोरेटमध्ये आहेत. त्यामुळे यामध्ये व्हर्चुअल करन्सीजचा उल्लेख नाही. त्यामुळे, क्रिप्टोकरन्सीवर जीएसटी आकर्षित होऊ शकतो.

क्रिप्टो एक्सचेंज GST आकारतात
भारतीय क्रिप्टो एक्सचेंज आपल्या युझर्सकडून आधीच GST आकारतात. ट्रेडिंग फी देखील आकारली जाते, जी एक्सचेंज बिटकॉइन, इथेरियम आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी किंमतीत जोडली जाते. एक्सचेंज त्यांच्या सामान्य टॅक्स पेमेंटचा भाग म्हणून सरकारला GST भरतात.

नव्या वर्षात 24 तासातील मृत्यूचा उच्चांक : सातारा जिल्ह्यात नवे 428 पाॅझिटीव्ह तर 16 मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 428 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 9. 82 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र नव्या वर्षातील कोरोना बाधितांचा मृत्यूचा उच्चांक गाठला आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 359 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 428 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 10 टक्क्यांवर खाली आला आहे. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी दिवसभरात 1066 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 5219 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 321 रूग्ण रूग्णालयात उपचारार्थ आहेत. रिकव्हरी रेट 95. 76 टक्के इतकी आहे.

कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेणाऱ्या विकृताला कोर्टाने दिली ‘हि’ शिक्षा

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाचा जेव्हा मोठ्या प्रमाणात प्रसार सुरु होता तेव्हा अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये कोरोना टेस्टसाठी एका लॅब टेक्निशियनने चक्क तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतले होते. या प्रकरणात आरोपी लॅब टेक्निशियनला न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये एका युवतीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगून परत एकदा युवतीच्या गुप्तांगातून स्वाब घेण्यात आला होता. त्यामुळे मोदी हॉस्पिटलचा लॅब टेक्निशियन अलकेश अशोक देशमुख या आरोपी विरोधात बडनेरा पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने 12 साक्षीदारांचा जबाब घेतला. यानंतर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देत आरोपी अलंकेश देशमुख याला 10 वर्षे सक्षम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
अमरावती शहरातील एका मॉलमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण मॉलमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. बडनेरा येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये चाचणी करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी झाल्यानंतर कोरोना सेंटरमध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत अल्केश देशमुख या लॅब टेक्निशियनने पिडीत तरुणीला तुझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गुप्तांगातूनही स्वॅब घ्यावा लागणार असे सांगून गुप्तांगातून स्वॅब घेतला. हि धक्कादायक घटना 28 जुलै 2020 रोजी घडली आहे.

Share Market : शेअर बाजाराच्या गतीला ब्रेक लागला, सेन्सेक्स 770 अंकांनी घसरला

Share Market

नवी दिल्ली । अमेरिकन आणि युरोपियन शेअर फ्युचर्समध्ये झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारालाही आज ब्रेक लागला. गुरुवारी, विकली एक्सपायरीच्या दिवशी, निफ्टी 219.80 अंक किंवा 1.24 टक्क्यांच्या घसरणीसह 17560.20 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 770.31 अंकांनी किंवा 1.29 टक्क्यांनी घसरून 58788.02 वर बंद झाला. बँक निफ्टी 39010 वर बंद झाला. यामध्ये 320.50 अंकांची म्हणजेच 0.81% ची घसरण झाली.

ऑटो शेअर्स वगळता सर्व सेक्टरल इंडेक्स रेड मार्कमध्ये बंद झाले. बँक, आयटी, रियल्टी, कॅपिटल गुड्स आणि ऑइल अँड गॅस इंडेक्स 1-2 टक्क्यांनी घसरून बंद झाले. बीएसई मिडकॅप इंडेक्स 1 टक्क्यांनी आणि बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 0.4 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

निफ्टी 50 चे टॉप 5 गेनर्स
1. Hero MotoCorp +2.93 %
2. Bajaj Auto Ltd. +2.44 %
3. Divi’s Lab +1.01 %
4. ITC Ltd. +.99 %
5. Maruti Suzuki India +.92 %

निफ्टी 50 चे टॉप 5 लुझर्स
1. HDFC -3.26%
2. NTPC -3.19 %
3. SBI Life Insurance -2.86%
4. Infosys -2.72 %

“मोदींचा वेताळ, केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो”

Narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय तपास यंत्रणेवरून विरोधकांकडून मोदी सरकारवरती निशाणा साधला जात आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसकडून पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्विट करीत “राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो.,” अशी टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत यांच्यवर ईडीने कारवाई केली आहे. या प्रकरणावरून सचिन सावंत यांनी मोदी सरकारवरटीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “वर्षानुवर्षे तो वेताळ झाडाला लटके. या वेताळाचा तपासही लटकलेला राहतो.

“संजय राऊतजी मोदी सरकार विरोधात बोलले. भावाला लगेच अटक! 1 जाने 2021 रोजी प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त केली. मग तपास वर्षभर का लटकवला? याच HDIL ने भाजपला 20 कोटीची देणगी दिली त्यांच्या खांद्यावर बसणार नाही,” असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

वाईन विक्रीला विरोध : साताऱ्यात व्यसनमुक्ती युवकचे पहिले ‘दंडवत- दंडुका’ आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्यावतीने साताऱ्यात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी दंडवत दंडुका आंदोलनाला पोलिसानी मज्जाव केल्याने वारकरी आणि पोलिसांच्यात काहीकाळ शाब्दिक चकमक उडाली. या दरम्यान वारकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमलेल्या वारकऱ्यांनी पोलिसांच्या दंडेलशाहीचा निषेध करत रस्त्यावरच दंडवत घालत प्रशासनाचा निषेध केला.

सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला असून हा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी तो तातडीने मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी व्यसनमुक्त युवक संघ यांच्यावतीने आणि बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे हातात लाकडी दांडू घेऊन दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले. वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली असून या सरकारने ऐकलं तर ठीक अन्यथा हातात घेतलेला दंडुका सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी दाखवण्यात येईल असा इशारा यावेळी कार्याध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी दिला आहे.

कराडच्या आ. बाळासाहेब पाटलाचं पोरंगही दारू पितं ः बंडातात्या कराडकर

आंदोलनात ह. भ. प बंडातात्या कराडकर यांनी राजकीय नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, कोणत्या पुढाऱ्याची पोरं दारू पित नाहीत. कराडचे आमदार बाळासाहेब पाटील याचं पोरंगही दारू पितो का नाही मी सांगतो.

परमबीर सिंग हेच अँटेलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड, पण केंद्राकडून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न

malik parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच अँटेलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत. मात्र एनआयएकडून परमबीर सिंह यांना वाचवण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सचिन वझे, परमबीर सिंग प्रकरणावर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला.

नवाब मलिक म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करुन केंद्रातील भाजप सरकार महाविकास आघाडी नेत्यांविरोधात कारवाई करत आहेत. राजकीय विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँटेलिया प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. एनआयए ला हे माहीत आहे, पण तरीही त्यांना वाचवण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे.

परमबीर सिंग यांनी ईडीला स्टेटमेंट दिलं आहे. सचिन वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा माझ्यावर दबाव होता, असा आरोप सिंग यांनी केला आहे. अनिल देशमुखांना अडचणीत आणणे किंवा या चार्जशीटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना बदनाम केले जात आहे. त्यांनी स्टेटमेंट दिलं असेल, पण दिलेलं स्टेटमेंट खरं असतं असं नाही असेही नवाब मलिक यांनी म्हंटल.