Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2932

परदेशवारी केली नाही तरी ओमायक्रॉनची बाधा

औरंगाबाद – परदेशवारी करून आलेल्यांनाच ओमायक्रोनची लागण होत असल्याचे आतापर्यंत समोर येत होते. मात्र, परदेशवारी केलेली नसताना ही आता ओमायक्रोन ची लागण होत आहे. शनिवारी अहवाल आलेला 36 वर्षीय तरुण डिसेंबर मध्ये आफ्रिकेहून परतला, तर 27 वर्षे कोरूना युद्धात तरुणीने कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.

औरंगाबाद येथील दोघांना ओमायक्रोनची बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. या दोन रुग्णात 36 वर्षीय तरुण आणि 27 वर्षाय तरुणींचा समावेश आहे. सुदैवाने हे दोघेही आता निगेटिव आहेत. त्यामधील 36 वर्षीय तरुण 21 डिसेंबर रोजी आफ्रिकेतून शहरात दाखल झाला. प्रारंभी आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह होता. त्यानंतर सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाल्यावर 28 डिसेंबर रोजी पुन्हा तपासणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तो मेल्ट्रोनमध्ये दाखल झाला. त्या तरुणाने दोन्ही डोस घेतलेल्या आहेत. 7 जानेवारी रोजी तपासणीचा अहवाल निगेटिव आला.

27 वर्षीय तरुणी सिडको परिसरातील रहिवासी असून एका खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. कोरोनाबाधित रुग्णांशी संपर्क आल्यामुळे 30 डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव आला. त्यानंतर 9 जानेवारी रोजी अहवाल निगेटिव्ह दोघांचा शनिवारी ओमायक्रोनचा अहवाल आला आणि यंत्रणेची धावपळ उडाली.

मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन करायला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागले आहे. त्याचाच भाग म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका दलीत कुटुंबात भोजन केल्याचा एक फोटो देशभर पसरला. त्यावरून शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन योगी आदित्यनाथ आणि भाजपवर निशाणा साधला. मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन करायला असा टोला शिवसेनेने लगावला. भाजप पुढाऱ्यांना आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो असे शिवसेनेने म्हंटल.

योगी आदित्यनाथ यांनी दलिताच्या घरी जेवण घेतल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. गोरखपूरचे खासदार मनोज तिवारी यांनीही त्याच वेळी दलिताघरी जेवण घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. दलिताला दलित म्हणून हिणवण्याचा हा राजकीय प्रकार आहे. काही वर्षांपासून भाजप पुढाऱयांचा हा नवा सामाजिक परिवर्तनाचा फॉर्म्युला समोर आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळय़ात गंगास्नान केले व नंतर काही दलितांचे पाय वगैरे धुतल्याचे नाटय’ घडवले. त्यामुळे दलित, मजूर, सफाई कामगारांचे प्रश्न उत्तर प्रदेशात तरी सुटले काय? खास दलितांच्या घरी जेवण्याचा कार्यक्रम घडवणे म्हणजे दलितांच्या बाबतीत आपली वेगळी भूमिका आहे हे स्पष्ट करण्यासारखेच आहे. असे शिवसेनेनं म्हंटल.

एका बाजूला आपण जातीप्रथा संपविण्यासाठी सरकारी कार्यक्रम राबवायचे आणि त्याच वेळी एखादी व्यक्ती दलित आहे, अशी दवंडी पिटवून त्याच्या घरी भोजन मेळावा घ्यायचा हे उपक्रम राबविण्यात भाजपचा हात कोणी धरणार नाही असे शिवसेनेन म्हंटल. भाजपच्या पुढाऱयांना आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो याचा सरळ अर्थ असा की, त्यांच्या मनात ‘जात’ आहे व ती जात घालवायची त्यांची तयारी नाही. आज साराच देश राजकीय फायद्या-तोटय़ासाठी जातीय चौकटीत वाटला गेला आहे. त्यामुळे जातीपातीचे निर्मूलन हे थोतांड ठरले आहे असा आरोप शिवसेनेने केला.

भ्रष्ट्राचार करणारे पांढरे हत्ती न पोसता शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा…; राजू शेट्टींचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी (शेत) जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना खड्यात घालण्यापेक्षा राजरोसपणे टक्केवारी व भ्रष्ट्राचार करणारे पांढरे हत्ती न पोसता शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा महागात पडेल,” अशा इशारा ” शेट्टी यांनी दिला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भूमी अधिग्रहण कायदा २०१३ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांनी लोकसभेत मंजूर करून घेतला. या कायद्यात अनेक चांगल्या तरतुदी होत्या म्हणून मी देखील त्याचे समर्थन केले. ज्या नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना स्वामीनाथ यांच्या सुत्राप्रमाणे दीडपट हमीभाव देण्याचे अभिवचन देवून, सत्ता काबीज केली. तेच नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांना स्वामीनाथन सुत्राप्रमाणे हमी भाव देण्याचे राहीलले बाजूला परंतु शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहीत झाल्यानंतर त्याला कोणत्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही, अशाप्रकारची तरतुदी असलेली दुरूस्ती विधेयक आणले.

महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रामुख्याने स्थापन झालेले होते. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेला भूमी अधिग्रहणाच्या मध्येच चौपटीपेक्षा कमी मोबदला घेण्यासाठी जी दुरूस्ती आली होती, त्याला विरोध केलेला होता. याच महाविकास आघाडी सरकारने व मंत्र्यांनी या ठिकाणी मात्र भूमी अधिग्रहण करत असताना, खर्च वाढतो, सरकारवर बोजा पडतो या नावाखाली २० टक्क्यापासून ते ७ टक्क्यांपर्यंत मोबदला कमी देण्याच वटहुकूम काढलेला आहे.

महाविकास आघाडीने घेतलेला हा निर्णय सरळ सरळ शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा आहे. सरकारला खर्चाची एवढीच चिंता वाटत असेल तर शाखा अभियंता, उपअभियंता आणि मंत्रालयीन अधिकारी , लोकप्रतिनिधी यांचा खर्च कमी करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

मांढरदेव गडावर नो एंन्ट्री : आजपासून काळूबाईच्या यात्रेला प्रारंभ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे. मात्र , कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली असून देवीची रितीरिवाजा प्रमाणे पुजा करण्यात आली आहे. भाविकांना मात्र प्रशासनाने मांढरगडावर येण्यास बंदी घातली आहे. यावेळी मांढरदेव ट्रस्टने देवीच्या पुर्ण मंदीराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे.. यामुळे रात्रीच्या वेळी आणि दिवसा मंदीर परिसर झगमगून गेला आहे.

वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील काळूबाई ही महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे लाखो भाविक काळूबाईची यात्रेला शाकंभरी पोर्णिमेला गर्दी करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. गेल्या काही महिन्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्याने यंदाच्या वर्षी काळूबाईचे दर्शन होईल असं भाविकांना वाटत होतं. मात्र ओमायक्रॉनमुळे यंदाच्याही वर्षी मांढरदेवी गडावर यात्रेच्या दिवशी येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.

शासनाच्या नियमामुळे भाविकांना यंदाही बंदी घालण्यात आली असली तरी दरवर्षीप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांमार्फत आणि गावातील ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज यात्रा पूर्ण केली जात आहे. भाविकांनी गडावर येऊ नये यासाठी पंचक्रोशीतील सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून गडावर भाविकांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात.

नवरा संशय घेतो म्हणून उच्चशिक्षित तरुणीने गाठले हर्सूल तलाव, पण…

औरंगाबाद – नवरा चारित्र्यावर संशय घेतो. अडीच वर्षाच्या मुलीला स्वतःकडे ठेवून नवऱ्याने पत्नीला जाधववाडी येथील माहेरी घरी नेऊन सोडले. माहेरी वडील वारलेले. त्यात नवऱ्याचा आधीचा त्रास सहन करू शकत नसल्यामुळे हर्सूल तलावात आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीला दामिनी पथकाने मदतीचा हात दिल्यामुळे तरुणीचा जीव वाचला, हा प्रकार काल घडला.

जाधववाडी येथील एम एस्सी झालेल्या 26 वर्षीय तरुणीचा विवाह एका युवक व सोबत झाला होता. या दोघांना एक मुलगी झाली. त्यानंतर तो सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तरुणी एका कंपनीत नोकरीही करते. नवऱ्याने अडीच वर्षाच्या मुलीला स्वतःकडे ठेवून तिला संशयावरून माहेरी नेऊन सोडले. त्यामुळे तणावातून तिने हर्सूल तलावात आत्महत्या करण्याचा निर्णय रविवारी घेतला. ती तलावावर गेली. मात्र सुरक्षारक्षकांना संशय आल्यामुळे त्यांनी तिला अडवून दामिनी पथकाला फोन केला. त्यानंतर फौजदार सुवर्णा उमाप यांनी पोलीस अंमलदार लता जाधव, मनीषा बनसोडे यांना घटनास्थळी पाठवले.

रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या विवाहितेला आपण कोणता निर्णय घेतला याची उपरती समुपदेशननंतर आली. त्यानंतर तिने जीव वाचवल्याबद्दल दामिनी पथकासह हर्सूल तलाव परिसरातील सुरक्षारक्षकांच्या आभार मानत आई व भावासोबत माहेर गाठले.

काॅलेज परिसरात अवैधरित्या पिस्टल बाळगणारास अटक

कराड | शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या एकास अटक केली आहे. सैदापूर होली फॅमीली याठिकाणी पांढऱ्या रंगाची ॲक्टीवा मोटार सायकल (MH- 50- J- 6833) या गाडीवरून संशयित अखिलेश सुरज नलवडे हा पिस्टल घेवून फिरत होता. याबाबत गोपनीय बातमीदारांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली होती.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी सपोनि अमित बाबर, सपोनि विजय गोडसे व त्यांचे पथकास कळवून पुढील कारवाई करण्यात आली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या व ओगलेवाडी दुरक्षेत्राचे पथकाने छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी अभिलेखावरील गुन्हेगार अखिलेश सुरज नलवडे हा संशयीतरित्या पकडले. त्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अखिलेश सुरज नलवडे (वय 21 वर्षे, पीडी पाटील नगर, शिवार हॉटेल समोर, गजानन हौसिंग सोसायटी गोवारे रोड ता.कराड) असे सांगितले. त्याची दोन पंचासमक्ष जागीच अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात असलेल्या एका मोटार सायकलचे डिकीत पिस्टल 100,000/- रुपये किंमतीची एक सिल्वर रंगाची लोखंडी पिस्टल त्यास लोखंडी मुठीस फायबर कव्हर असलेले देशी बनावटीचे मॅगझीन सह पिस्टल व 50,000/- रुपये किंमतीची ॲक्टीव्हा मोटार सायकल मिळून आली. गुन्हयाचा पुढील तपास सपेानि अमित बाबर हे करत आहेत.

सदरची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि अमित बाबर, सपोनि विजय गोडसे, पोउपनि अशोक भापकर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, सचिन सुर्यवंशी, पोलीस नाईक संजय जाधव, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे, धीरज कोरडे, किशोर तारळकर यांनी केलेली आहे.

शाळा, महाविद्यालय बंद निर्णयाचा फेरविचार करावा

औरंगाबाद – राज्यात कोविड बाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परत ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, सरकारने एकीकडे मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह आदी ठिकाणे 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिली असताना शाळा, महाविद्यालये सरसकट बंद का ? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शाळा बंद असल्याने मुले शिक्षणापासून तर दुरावली आहेतच पण त्याच बरोबर त्यांच्या लेखन, वाचन आणि ज्ञानग्रहण क्षमतेवर देखील विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शिक्षणात खंड पडल्याने अनेक मुले शेतात काम करत असून बालविवाह प्रमाण वाढले आहे. कोविड सेंटरसाठी प्रशासनाकडून वसतिगृह ताब्यात घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. वसतिगृह ताब्यात घेण्याच्या विषयाचा देखील शासनाने विचार करावा.

शाळांना वारंवार अशा प्रकारचा ‘ब्रेक’ लागत राहिला तर याचा विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना मुक्त गावे; तर शहरातील कोरोनामुक्त हद्दीतील शाळा, महाविद्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

लसीमुळे नाहीतर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारणआले समोर

aarya ghatkopar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. हि बातमी समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र संबंधित मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचा दावा महानगर पालिकेकडून करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
घाटकोपरमधील रहिवासी असणाऱ्या 15 वर्षीय आर्याने 8 जानेवारी रोजी राजावाडी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. यानंतर 12 जानेवारी तिचा अचानक मृत्यू झाला होता. यानंतर या मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचा मजकूर तिच्या फोटोसह सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. यानंतर पालिकेने संबंधित व्यक्तीकडे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचे पुरावे मागितले. पण त्याच्याकडे या गोष्टीचा एकही पुरावा नव्हता.

या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मृत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृत आर्याच्या आजोबांच्या मते लसीकरणामुळे तिचा मृत्यू झालेला नाही. तिने अभ्यासाचा अतिताण घेतला होता. हा ताण असह्य झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला आहे. असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या दु:खद प्रसंगी कोणीही याचं राजकारण करू नये असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

क्षुल्लक कारणावरून पती – पत्नीमध्ये वाद झाला अन्…

bhandara crime

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पती- पत्नीमध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यानंतर दोघांनीही स्वतःला जाळून घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. कारधा येथे मध्यरात्री हि घटना घडली आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला तर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा बचावला आहे. मृत व्यक्तीची नावे महेंद्र सिंगाडे आणि मेघा सिंगाडे अशी आहेत. शनिवारी मध्यरात्री त्यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला कि तुही नको नि मीही नाही, असं म्हणून महेंद्रने आधी स्वतःवर रॉकेल ओतले. नंतर पत्नी मेघावर रॉकेल ओतून दोघांना पेटवून घेतले.

चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार
घरगुती भांडणाच्या कारणातून महेंद्रने पत्नी मेघासह आपल्या 3 वर्षीय मुलाला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर 3 वर्षीय मुलावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारधा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

तर दुसरीकडे रामटेक तालुक्यातील बनपुरी गावात प्रणाली रामकृष्ण धावडे या महिलेचे तिच्या सासूशी काही कारणावरून भांडण झाले. यानंतर प्रणालीने आपल्या मुलाला विष पाजून स्वतःही विष प्राशन केले. यामध्ये मुलगा वेदांतचा मृत्यू झाला तर शेजाऱ्यांनी वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळं प्रणालीचा जीव वाचला आहे. तिच्यावर रामटेक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा विस्फोट सुरुच ! आज साडेसहाशे हून अधिक बाधित

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसहाशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 658 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 519 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 139 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 54 हजार 307 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3662 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3614 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 150 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 94 तर ग्रामीणमधील 56 रुग्णांना सुटी देण्यात आली.