Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2977

अर्ज करा : साताऱ्यात 334 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

Job Search

सातारा | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्यामार्फत 12 व 13 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून करण्यात आले आहे.

या मेळाव्यात लिपिक, टॅली, ऑपरेटर, कॅशिअर, अकौंटंट, प्रोग्रामर, वेब डिझायनर, शिक्षक, ॲडमिस्ट्रेटर, मार्केटिंग ऑफिसर, लॅबइनजार्च अशा प्रकारची एकूण 334 रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या सकेतस्थळावर ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पुर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे, जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

तसेच नोकरी इच्छुक उमेदवारांनी देखील ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टवर उपलब्ध रिक्त पदांना ऑनलाईन अर्ज करावे. उद्योजकांकडून उमेदवारांच्या मुलाखती टेलीफोन अथवा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा येथे प्रत्यक्ष अथवा 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.

एसटीच्या चाकांना गती ! जिल्ह्याभरात सव्वाशेहून अधिक बस रस्त्यावर

ST

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात काल दिवसभरात विविध मार्गावर 129 बस सोडण्यात आल्या होत्या. या बसने 378 फेऱ्या केल्या असून साडेपाच हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी दिवसभरात प्रवास केला. यात पुणे मार्गावर 14 तर नाशिक मार्गावर 7 बसने 14 फेऱ्या केल्या. तसेच शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या आता 38 झाली आहे.

एसटी प्रशासनाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती पत्करलेल्या माजी चालकांची करार पद्धतीने नेमणूक करण्याची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत 20 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. काही प्रमाणात सेवेत हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटीने शुक्रवारी सिडको बस स्थानकातून 25 लालपरी 2 हिरकणी अशा 27 बस सोडल्या होत्या. त्या बसेसनी 72 फेर्‍या केल्या. मध्यवर्ती बस स्थानकातून 21 शिवशाही बस ने नाशिक व पुणे मार्गावर 28 फेऱ्या केल्या. तर एकूण 40 बसने पुणे, नाशिक, कन्नड, सिल्लोड, बुलढाणा, अहमदनगर, वैजापूर, मार्गावर 82 पुऱ्या केल्या आहेत. पैठण डेपोने औरंगाबाद, जालना, शहागड, पुणे, शेवगाव, अंबड मार्गावर 15 लालपरी चालवत 40 फेऱ्या केल्या. सिल्लोड डेपोतूनही औरंगाबाद, जालना, कन्नड मार्गावर 5 लालपरी चालवत 20 फेऱ्या केल्या आहेत.

वैजापूर डेपोतून औरंगाबाद, कोपरगाव, गंगापूर आणि नाशिक मार्गावर 5 बस सोडण्यात आल्या. कन्नड डेपोतून औरंगाबाद, वडनेर, पिशोर, सिल्लोड, चिंचोली, भारंबा, वैजापूर, फुलंब्री, गंगापूर, जेऊर या मार्गावर एकूण चोवीस बस चालवत 76 फेऱ्या केल्या. गंगापुर डेपोने औरंगाबाद, कन्नड आणि वैजापूर मार्गे सात बस चालवण्यात आल्या. तर सोयगाव डेपोने 2 शिवशाही, 6 हिरकणी अशा 8 बस चालवण्यात आल्या. दिवसभरात 129 बसच्या 378 फेऱ्या करत जिल्ह्याभरात 5 हजार 507 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यास होणार कारवाई

सातारा | औषध दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. अशाप्रकारे औषध दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनाप्रमाणे उपचार असल्यामुळे शेड्युल एच औषधे व स्टेरॉइडस् यांची विक्री नोंदणीकृत डॉक्टराच्या चिठ्ठीवर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्टेरॉइडस, गर्भपातावरील औषधे ॲन्टीबायोटीक्स आदी औषधे रुग्णांच्या तोंडी मागणीवर विक्री केली जाऊ नयेत यासाठी औषध दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणीकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास अशा औषध दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त यांना दिले आहेत.

आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार

Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कुटुंबीयांसहित जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. सदर इसमाने अत्यंत अर्वाच्य भाषेत शेलार याना शिविगाळ केली असल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती

आशिष शेलार यांना दोन दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी दोन्ही अज्ञात मोबाईल नंबरची माहिती देत तपास करण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी ते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

आशिष शेलार याना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत या धमकीची मुंबई पोलिसांनी गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. आशिष शेलार हे महाविकास आघाडी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत. आशिष शेलार लढवय्ये असल्यानं त्यांच्या विरोधात असे प्रकार सुरु आहेत. शेलार यांना आलेल्या धमकीची मुंबई पोलिसांनी गांभीर्यानं दखल घ्यावी, असं फडणवीस म्हणाले.

वनविभागाची कारवाई : कराडला शिकारीसाठी वाघरी लावणाऱ्या दोघांना अटक

कराड | जखिणवाडी (ता. कराड) येथे वनक्षेत्राच्या लगत शिकार करताना दोघांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. वनविभागाने शुक्रवारी (दि. 7) रात्री 10 च्या सुमारास ही कारवाई केली आहे. संशयितांनी शिकारीसाठी तीन वाघरी लावल्या होत्या. यापैकी एका वाघरीमध्ये मृतावस्थेत ससा आढळला आहे. संतोष शिवाजी बनसोडे (वय 21, रा. बाबाजीनगर, जखिणवाडी), पांडुरंग धोंडीराम नाईक (रा. भोसले कारखाना, जखिणवाडी, ता. कराड) असे अटक करण्यात आलेली आरोपींची नावे आहेत.

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री (दि. 7) जखिणवाडी राखीव वनक्षेत्राच्या लगत खाजगी क्षेत्रात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनक्षेत्रपाल टी. डी. नवले, वनपाल मलकापूर, वनपाल ए. पी. सवाखंडे, वनरक्षक आर. एन. जाधवर, ए. एस. सोळंकी, ए. व्ही. पाटील, यु.एम. पांढरे, योगेश बडेकर असे सर्वजण मिळून जखिणवाडी लगतच्या खाजगी क्षेत्रात रात्री 8 वा. च्या सुमारास गस्त करीत असताना, वेगवेगळ्या तीन ठिकाणी वाघरी लावलेले आढळले. तीन ही वाघरींची पाहणी केली असता त्यातील एका वाघरी मध्ये ससा (मादी) -1 मृत अवस्थेत अडकलेली दिसली. त्यानंतर आजुबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता, तेथे एका ठिकाणी बांयडींग तारेची फासकी लावलेली आढळली. उर्वरीत दोन मोकळ्या वाघरी व बांयडिंग तारेची फासकी काढून ताब्यात घेतली.

ज्या वाघरीत ससा अडकला होता, त्या वाघरीच्या परिसरात वरील सर्व वन अधिकारी कर्मचारी दबा धरून बसले होते. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सदर वाघरीकडे दोन व्यक्ती हातातील बॅटरी घेवून येत असताना दिसले. त्या दोन्ही व्यक्तींनी वाघरीतील मृत ससा काढून घेवून जात असताना त्यांच्यावर धाड टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी संतोष शिवाजी बनसोडे (वय 21 वर्षे सध्या रा. बाबाजी नगर, जखीणवाडी ता. कराड), पांडूरंग धोंडीराम नाईक मुळ (रा. पोहाळवाडी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर (सध्या रा भोसले कारखाना, जखीणवाडी ता कराड), वरील दोन्ही आरोपींकडून वाघरी 3 नग, बायडिंग तारेची फासकी- 1 नग जप्त करुन मृत सशाला ताब्यात घेतले सदर प्रकरणाचा पुढील तपास सातारा वनविभाग उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली सातारा सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, हे करीत आहेत.

Real me कडून GT 2 proचे लॉंचिंग; जाणून घ्या वैशिष्ट्य अन् दर

realme gt 2 pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध मोबाईल कंपनी रिअल मी ने नुकतेच आपल्या GT सिरीज चे लॉंचिंग केलं असून रिअल मी GT 2 PRO…या मोबाईलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चला आपण जाणून घेऊया रिअल मी GT 2 pro ची वैशिष्ट्य

रिअल मी GT 2 pro या मोबाईलला 5000 mAh ची दमदार बॅटरी असून तब्बल 65 वॅट चा सुपरडार्ट चार्जेर आहे. मोबाईल मध्ये ऍडव्हान्सड अँटेना मॅट्रिक्स सिस्टीम, डॉल्बी अटमोस डूअल स्टेरिओ स्पीकर तसेच अँड्रॉइड 12:0 वर आधारित इन्स्टॉल केलेलं Real me UI 3.0 हे व्हर्जन आहे.

रिअल मी GT 2 pro मोबाईलचा डिस्प्ले 6.67 इंच एवढा मोठा असून त्याला ऍडव्हान्सड कॉर्निंग गोरिला ग्लास चे प्रोटेक्शन आहे.

मोबाईलच्या कॅमेरा बाबत बोलायचं झालं तर 50 MP चा मुख्य कॅमेरा असून 8 MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. तर 2MP चा मायक्रो कॅमेरा आहे. मोबाईल ला सेल्फी साठी 16 MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

रिअल मी GT 2 pro च्या स्टोरेज चे 3 प्रकार आहेत..एक म्हणजे 8GB+128 GB.. दुसरा म्हणजे12GB+ 256 GB…आणि तिसरा म्हणजे 12 GB+512 GB

हा स्मार्टफोन पेपर व्हाइट, पेपर ग्रीन, स्टील ब्लॅक आणि टायटॅनियम ब्लु या कलर मध्ये मिळू शकतो. रिअल मी GT 2 pro स्मार्टफोन ची किंमत 46 हजारच्या आसपास आहे.

साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला.. दहा वाजले तरी शहरातील रस्त्यावर दाट धुक्याची गर्दी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या हवामान बदलामुळे आलेल्या अवकाळी पावसाचे सावट सध्यातरी हटले आहे. दररोज हवामानात बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे दिवसभर कडक ऊन आणि रात्री गारठा पडू लागला आहे. सायंकाळी तापमानाचा पारा घसरत असून पहाटे धुक्यांची रस्त्यावर गर्दी केल्याने नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे.

वाढत्या थंडी आणि धुक्यांचा सामना मॉर्निंग वॅकला जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना दूध विक्रेत्यांना, औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.. या धुक्यामुळे ज्वारी सह, भाजीपाला, फळ फळबागांना पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटणसह माण, खटावलाही धुक्याची झालर पसरलेली होती.

महाबळेश्वरला तापमानाचा पारा सकाळी 10 वाजता 15 अंशावर होता. पर्यटकांनी शनिवार व रविवार सुट्ट्यामुळे गर्दी केलेली आहे. हवामानात थंडीचा कडाका वाढल्याने पर्यटक रूमबाहेर पडता दिसत नाहीत. महाबळेश्वर व पाचगणी येथे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे दुपारनंतर थंडी कमी झाल्यानंतर पर्यटक महाबळेश्वर, पाचगणी येथील पाॅंईटसवर भेटी देत आहेत.

शहरात सुरू होणार पाच कोविड केअर सेंटर

औरंगाबाद – कोरोना ची तिसरी लाट उंबरठ्यावर असून शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सोमवारपासून पाच कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यायचे असल्यास त्यांना होमआयसोलेशन साठी तातडीने आपल्या भागातील मनपा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क साधून नाव नोंदवावे लागणार आहे. यासाठी मनपाने वॉररूम तयार केली असून येथून होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येणार आहे. यासाठी वॉररूम मध्ये दहा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. डॉक्टर दिवसातून दोनवेळा होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांशी संपर्क साधून तब्येतीची विचारपूस करतील व गरज भासल्यास वैद्यकीय सेवेसाठी पुढील निर्णय घेतील. वॉररूमसाठी पाच दूरध्वनी सुरू करण्यात येणार आहेत.

कोविड केअर सेंटर व‌ बेड –
किलेअर्क – 300 बेड
एमआयटीचे दोन वसतिगृह – 550 बेड
शासकीय अभियांत्रिकी वसतिगृह – 450 बेड
देवगिरी महाविद्यालयाचे वसतिगृह – 480 बेड
आयएचएम कॉलेजचे वसतिगृह – 80 बेड

खळबळजनक!!! राज्यात दिवसभरात 40 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येने कहर केला असून तब्बल 40 हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असून जनतेमध्ये चिंतेच वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लावले असून देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतच चालली आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 40,925 नवीन कोरोना रुग्ण सापडले. राज्यात 14,256 बरे झाले असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 1,41,492 एवढी असून ओमीक्रोन रुग्णसंख्या 876 वर पोहोचली आहे.

मागील  पाच  दिवसातील  रूग्ण संख्या 

6 जानवारी – 36,265  रूग्ण
5 जानेवारी –   26, 538  रूग्ण
4 जानेवारी – 18, 466 रूग्ण
3 जानेवारी – 12, 160 रूग्ण
2 जानेवारी – 11, 877 रूग्ण
1 जानेवारी – 9,170 रूग्ण
31 डिसेंबर – 8067 रूग्ण

शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

Water supply
Water supply

औरंगाबाद – महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात काल दुपारी अचानक ट्रान्सफॉर्मर मध्ये मोठा बिघाड झाला. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. काल सायंकाळी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येणार होता तो झाला नाही. आजही अर्ध्याहून अधिक शहराला पाणीपुरवठा होणार नाही. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

जलशुद्धीकरण केंद्रात 56 एमएलडी आणि 100 एमएलडी अशा दोन पाणीपुरवठा योजना आहेत. सिडको-हडकोसह जून्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 100 एमएलडी योजनेच्या ट्रांसफार्मर मध्ये काल दुपारी अचानक बिघाड झाला. यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. सायंकाळी उशिरा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा चे वेळापत्रक एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले. शहराच्या ज्या भागात काल पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात आज पाणी पुरवठा होईल.

ट्रांसफार्मर दुरुस्तीच्या काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ढोरकिन येथील पाण्याची गळती बंद करण्याचे काम केले. याच ठिकाणचा एक एअर व्हॉल्व्हदेखील बदलण्यात आला. ही माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.