Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5742

WHO ची चेतावणी; ज्या देशात कमी झाले संक्रमण तिथे पुन्हा वाढणार कोरोना रुग्णांची संख्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी म्हटले आहे की,’ ज्या देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण कमी होत आहे, तेथे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास, कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉक्टर माईक रायन यांनी आपल्या ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये सांगितले की,’ संपूर्ण जग हे अजूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या पहिल्या टप्प्यामध्येच आहे.

ते म्हणाले की,’ बर्‍याच देशांमध्ये या संसर्गाची प्रकरणे कमी कमी होत आहेत, मात्र असे असूनही मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. रायन म्हणाले की,’ य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव बर्‍याचदा अनेक लाटांमध्ये येतो, म्हणजे याचा उद्रेक पुन्हा अशा ठिकाणी होऊ शकतो जेथे की पहिल्यांदा ही लाट थांबली होती. अशीही एक शक्यता आहे की, जर ही पहिली लाट थांबविण्यासाठीच्या उपाययोजना लवकर केल्या गेल्या नाहीत, तर पुन्हा या संक्रमणाचे प्रमाण वेगाने वाढू शकते.

अनेक देशांमध्ये कोविड -१९ चा संभाव्य उपचार म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर केला जात आहे. मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने खबरदारी म्हणून याच्या क्लिनिकल चाचण्या या तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. संघटनेचे प्रमुख टेड्रॉस एडॅनॉम गेब्रिझ यांनी सोमवारी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की,’ लॅन्सेटमध्ये याविषयीच्या अभ्यासाच्या झालेल्या प्रकाशनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोवीड -१९ च्या रूग्णांवर मलेरियाविरोधी औषधे वापरल्याने त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढू शकते असे या अभ्यासामध्ये नमूद केले आहे.

टेड्रोस म्हणाले की, ‘ या तथाकथित सॉलिडॅरिटी ट्रायल वर्किंग ग्रुपने खबरदारीचा म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा वापर करणे बंद केले आहे. कोरोना विषाणूच्या संभाव्य उपचारांसाठी रूग्णांची चाचणी घेण्यासाठी अनेक देशातील रुग्णालयांनी या कार्य गटाला नामांकित केले आहे. टेड्रोस म्हणाले की,’ डेटा प्रोटेक्शन मॉनिटरींग बोर्डाद्वारे सुरक्षा डेटाचा आढावा सध्या घेण्यात येतो आहे. मात्र तोपर्यंत या गटाने सॉलिडॅरिटी चाचणीत हायड्रॉक्सीक्लोरिकिनचा वापर करणे तात्पुरते थांबविले आहे.

इतर औषधांची चाचणी ही सुरूच ठेवावी असा आग्रहही त्यांनी धरला आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर सामान्यत: संधिवातावर उपचार करण्यासाठी केला जातो, मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींनी आपण ते औषध घेत असल्याची घोषणा केली. म्हणूनच, अनेक देश हे औषध विकत घेण्यास प्रेरित झाले. ब्राझीलच्या आरोग्यमंत्र्यांनीही गेल्याच आठवड्यात कोविड -१९ च्या कमी गंभीर प्रकरणांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन तसेच अँटी-मलेरियल क्लोरोक्विन वापरण्याची शिफारस केली होती.

लॅन्सेटच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की,’ दोन्ही औषधांचे संभाव्य गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, विशेषतः हृदय रोग. एका लॅन्सेट अभ्यासानुसार शेकडो रुग्णालयांमधील ९६००० रुग्णांचे रेकॉर्ड पाहिल्यानंतर असे आढळले की,’कोविड -१९ च्या रूग्णांमध्ये दोन्ही औषधांचा काहीच फायदा झाला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

विमान सुरु करण्याची नुसती घोषणा? अनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल २ महिने ठप्प पडलेली देशांतर्गत विमानसेवा काल सुरु झाली खरी. मात्र अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने, मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर विमानसेवा सुरु करून विमान अचानक रद्द करायची होती तर ती सुरूच का केली असा प्रश्न आता विमानप्रवास विचारत आहेत.

लॉकडाऊन आणि कोरोनाचा धोका असताना पुन्हा माघारी परतावे लागणार आहेत. त्यामुळे येण्या-जाण्याचा खर्च कोण देणार, असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.दरम्यान, १ हजार १५० उड्डाणांपैकी दिल्लीतल्या ८२ फेऱ्यांसह देशभरातील एकूण ६३० विमानसेवा रद्द करण्यात आल्या. या विमानसेवेसाठी २२ मेपासूनच बुकिंग सुरु करण्यात आले होते. मात्र कोरोना वाढण्याच्या भीतीने महाराष्ट्रासह, तामिळनाडू आणि इतर काही राज्यांनी विमानसेवेवर मर्यादा घातल्याने, या सेवा रद्द कराव्या लागल्या.

नव्या सूचनांनुसार विमान झेपावण्याच्या किमान २ तास आधी प्रवासी विमानतळावर आले. मात्र तिथे पोहोचल्यावर उड्डाण रद्द झाल्याचे कळल्याने या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रद्द केलेल्या विमानांमध्ये दिल्लीहून जास्त करून पूर्व आणि ईशान्य भारताकडची विमानसेवा रद्द केली गेली. अम्फान वादळाने निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे इथली उड्डाणं रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भाजपचं सरकार लंडन- न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं, महाराष्ट्रात नाही- संजय राऊत

मुंबई । भाजपकडून राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाचा चांगलाच संचार घेतला. ‘भाजपचं सरकार लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं. कारण, तिथंही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. भाजपचे लोक तिथं सत्ता स्थापन करू शकतात. पण महाराष्ट्रात त्यांचं सरकार येणार नाही,’ असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. ते एका वृत्तवाहिन्यांशी बोलत होते

यावेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. ‘महाराष्ट्र सरकार अस्थिर करायचा आनंद कुणाला घ्यायचा असेल तर तो त्यांना घेऊ द्या. विरोधी पक्ष वेळ घालवण्यासाठी असा खेळ खेळत असेल तर तो त्यांनी खेळावा. त्यांना शुभेच्छा आहेत. पण सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि त्यापुढची निवडणूक सरकारमधील सर्व पक्ष एकत्रित लढवतील,’ असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. ‘धोका असलाच तर तो विरोधी पक्षाला आहे. त्यामुळं त्यांनी काळजी घ्यायला हवी. राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपालांची घेतलेली भेट, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली त्यांची चर्चा आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या राष्ट्रपती राजवटीची मागणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या भवितव्याबद्दल चर्चांना उधाण आले होते. त्यावर संजय राऊत यांनी राज्यातील सरकारला काही धोका नसल्याचे सांगत भाजपवर कडाडून प्रहार केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

गुड न्यूज! अमेरिकेच्या ‘या’ कंपनीने कोरोनावरील औषधाचा माणसावरील प्रयोग केला सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये मानवांवर कोरोनाव्हायरसच्या औषधाची चाचणी सुरू केल्याची घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस हे औषध तयार होईल, असे कंपनीने म्हटले आहे. ‘नोव्हावॅक्स’ या बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे लीड रिसर्चर डॉ. ग्रिगोरी ग्लेन यांच्या म्हणण्यानुसार मेलबर्न आणि ब्रिस्बेन शहरातील सुमारे १३१ जणांवर या औषधाची चाचणी सुरू झाली आहे.

ग्लेन यांनी नोव्हावॅक्स मेरीलँड मुख्यालयातील ऑनलाइन पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, ‘हे औषध काम करतंय आणि ते या वर्षाच्या अखेरपर्यंत लोकांकरिता उपलब्ध करून द्यायचे आहे, असा विचार करूनच आम्ही औषधे आणि लस एकत्रच तयार करत आहोत. यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडॅनॉम यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूएन) आर्थिक आणि सामाजिक परिषदेला ही माहिती दिली होती की, कोरोना लसीचे काम आता वेगाने होत आहे आणि कदाचित ते वेळेआधीच विकसित केले जाईल. टेड्रॉसने सांगितले की, जगभरात अशा एकूण ७ ते ८ टीम्स असून ते ही लस (कोविड -१९लस ) बनवण्याच्या अगदी जवळ आहेत आणि लवकरच संपूर्ण जगाला एक चांगली बातमी मिळेल.

टेड्रॉसच्या म्हणण्यानुसार बर्‍याच देशांनी यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे आणि जगभरात सुमारे १०० वेगवेगळ्या टीम्स या लसीची चाचणी घेत आहेत आणि त्यातील ८ टीम्स या अगदी जवळ आहेत. दोन महिन्यांपूर्वीच, आम्ही असा अंदाज केला होता की यावरचे औषध तयार होण्यास १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, मात्र आता हे काम वेगाने होते आहे आणि कदाचित ते वेळेआधीच विकसित केले जाईल. मात्र, टेड्रॉस यांनी सर्व देशांना संशोधन आणि या औषधाच्या प्रॉडक्शनसाठी सुमारे ८ अब्ज डॉलर्स जमा करण्याचे आवाहन केले आहे. ही लस तयार झाल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर प्रॉडक्शन करणे देखील आवश्यक असेल, म्हणून ही रक्कम कमी पडेल.

टेड्रोस म्हणाले की,’ यापूर्वी त्यांनी या संदर्भात ४० देशांना अपील केले गेले आहे. हे उल्लेखनीय आहे की, चीन, अमेरिका आणि युरोपमधील सुमारे एक डझन प्रायोगिक औषधे ही त्यांच्या चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत किंवा त्यांची चाचणी सुरू होणार आहे. यापैकी कोणती औषधे ही सुरक्षित आणि प्रभावी ठरतील हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र बरीच औषधे ही वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतात आणि वेगवेगळ्या तंत्राने ती बनविली जातात. यामुळे अशी आशा निर्माण झाली आहे की यापैकी कोणतीही औषधे यशस्वी होऊ शकतात. ‘नोव्हावॅक्स’ ने गेल्या महिन्यात एपीला सांगितले होते की, ‘आम्ही बनवणाऱ्या औषधांमध्ये आम्ही या विषाणूला स्पर्शही करत नाही, पण शेवटी हे एका रोग प्रतिकारशक्तीसाठी व्हायरससारखे भासते.’ ते म्हणाले, ” हा तोच प्रकार आहे ज्याप्रकारे ‘नोव्हावॅक्स’ नॅनो पार्टिकलचा वापर करून सर्दी साठी औषधे बनविते.”

Novavax shares plummet 84% after trial does not meet objectives

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

… म्हणून WHO ने दिला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवण्याचा इशारा

वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने मलेरियावर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्यांचा वापर Coronavirus कोरोनासाठीच्या उपचारांमध्ये करु नये असा इशारा दिला आहे. या औषधामुळे कोरोनावर प्रभावित परिणाम दिसून येता असा कोणताही पुरावा नसल्याचं म्हणत हा इशारा देण्यात आला आहे. आयसीएमआरकडूनही याला दुजोरा देण्यात आल्याचं कळत आहे.

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या वापरामुळे कोरोना रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय त्यामुळे मृत्यूदारतही काही प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच या औषधाचा वापर तातडीने थांबवण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. hydroxychloroquineची कार्यक्षमता आणि सुरक्षितता याबाबत महत्त्वाचे पुरावे हाती असणं तितकंच महत्त्वाचं असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेसियस यांनी सांगितले की, या औषधाच्या सॉलिडेरिटी ट्रायल अंतर्गत हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या चाचणीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड या औषधाच्या वापराबाबत समिक्षा करण्यात येणार आहे. त्यानंतर या औषधाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या औषधाचा वापर करोनाबाधितांच्या आरोग्यास घातक असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी ‘द लँसेंट’ या नियतकालिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार हायड्रोक्सिक्लोरोक्वीनने उपचार करण्यात आलेल्या करोनाबाधितांच्या मृतांची संख्या अधिक असल्याचे आढळले होते. करोनाबाधितांच्या उपचारासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या वापरासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्रही होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

वाद संपला? रेल्वे महाराष्ट्रातून मजुरांसाठी १४५ श्रमिक ट्रेन सोडणार

नवी दिल्ली । महाराष्ट्रात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यावरून राज्य सरकार आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात झालेल्या वादानंतर राज्यातून १४५ श्रमिक रेल्वे सोडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यापैकी पश्चिम बंगालसाठी मागितलेल्या ४१ गाड्यांना ममता बॅनर्जी सरकारने चक्रीवादळामुळे परवानगी नाकारली असल्याने त्यांच्यासोबत बोलून तोडगा काढा अशी विनंती रेल्वेने राज्य सरकारला केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी रेल्वे पुरेशा गाड्या देत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल इरेला पेटले होते. तासाभरात यादी द्या, लगेच व्यवस्था करतो, असे उलट आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला दिले होते. एवढेच नाही तर रात्री २ वाजल्यानंतर ट्वीट करून २ वाजेपर्यंत राज्य सरकार १२५ ट्रेनची यादी देऊ शकले नाही, असा टोलाही लगावला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १४५ ट्रेनची यादी रेल्वे मंत्रालयाला पाठवली असून रेल्वेनेही या ट्रेन सोडण्याची तयारी केली आहे.

अन्य राज्यांचा प्रश्न मिटला असला, तरी पश्चिम बंगालमध्ये ४१ श्रमिक ट्रेन पाठवण्याबाबत मात्र अद्याप अडचणी आहेत. कारण अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालने रेल्वे गाड्यांच्या प्रवेशाला मनाई केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढा असा सल्ला रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

केंद्रानं लागू केलेला लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरला; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली । केवळ २१ दिवसांत करोना विषाणूचा पराभव करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, देशातील लॉकडाउनला ६० दिवस झाले असतानाही कोरोना विषाणूचा संसर्ग जलदगतीने वाढतच आहे. देशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील लॉकडाउनचा उद्देशच असफल झाल्याचे ते म्हणाले.

लॉकडाउनच्या ४ टप्प्यांमध्ये ज्या परिणामांची पंतप्रधान मोदी यांना अपेक्षा होती तसे झाले नाही, असे राहुल पुढे म्हणाले. सरकारने सत्य स्वीकारायला हवे, कारण २१ दिवसांमध्ये सर्वकाही ठीक होईल असे मोदी म्हणाले होते, मात्र ६० दिवसांचा काळ उलटला तरी देखील काही होत नसल्याचे ते म्हणाले. आता लॉकडाउन अपयशी ठरलेला आहे. असे असताना सरकार आता पुढे काय करणार आहे हे आम्ही सरकारला विचारू इच्छितो, असे राहुल यांनी म्हटले आहे.

संपूर्ण जगामध्ये लॉकडाउन उठवला जात असताना तेथील रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहेत. भारतात मात्र लॉकडाउन सुरू असतानाच रुग्णांची संख्या जलदगतीने वाढताना दिसत आहे. आणि लॉकडाउन हटायला लागलेला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. केंद्रातील मोदी सरकार गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहे, याचेही उत्तर राहुल गांधी यांनी मोदी यांच्याकडे मागितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोन्या चांदीच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी वायदे बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. मंगळवारी सकाळी १०.३६ वाजता ६१ रुपयांच्या घसरणीसह एमसीएक्स एक्सचेंजमधील सोन्याचा वायदा भाव हा प्रति दहा ग्रॅम ४६,९१२ रुपये इतका होता. त्याशिवाय मंगळवारी सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा भाव ०.०१ टक्क्यांच्या खाली किंवा ३ रुपयांच्या किरकोळ घसरणीसह प्रति दहा ग्रॅम ४७,०६८ रुपयांवर ​​होता. मंगळवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायद्याचे दरही खाली आले आहेत.

फ्युचर्स मार्केटमधील चांदीच्या किंमतीबद्दल बोलताना मंगळवारी त्यात वाढ दिसून आली आहे. एमसीएक्सवर मंगळवारी पहाटे ३ जुलै, २०२० चा चांदीचा वायदा १.२५ टक्क्यांनी किंवा ४०४ रुपयांनी वाढून ४८,८६१ रुपये प्रति किलो राहिला.

जागतिक बाजारपेठेबद्दल बोलताना मंगळवारी सकाळी सोन्याच्या वायद्याच्या किमतीत घट झाली आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायद्याचे दर ०.०९ टक्क्यांनी किंवा १.५० डॉलरने कमी होऊन १,७५२ डॉलर प्रति औंस झाले. त्याच वेळी सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत ०.११ टक्के किंवा १.८३ डॉलरने वाढून १७३३.७८ डॉलर प्रति औंस झाली.

मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात चांदीच्या वायदा आणि स्पॉटच्या किंमती या दोहोंमध्ये वाढ दिसून आली. मंगळवारी सकाळी चांदीची जागतिक किंमत ही ०.७७ टक्क्यांनी किंवा ०.१३ डॉलरने वाढून १७.४२ डॉलर प्रति औंस झाली. त्याचबरोबर चांदीचा जागतिक वायदा भाव मंगळवारी सकाळी कॉमेक्सवर १.७६ टक्के किंवा ०.२९ डॉलरने वाढून १७.९८ डॉलर प्रति औंसवर होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

तुम्ही आमचा अभिमान आहात पपा – जेनेलिया देशमुख 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची आज ७५ वी जयंती आहे. ते आता शरीराने नसले तरी त्यांच्यावर प्रेम करणारी असंख्य समर्थकांच्या साठी ते आजही तितकेच महत्वाचे आहेत. त्यांचे समर्थक त्यांना विविध माध्यमातून अभिवादन करताना दिसून येत आहेत. या सोबतच त्यांचे कुटुंबीयही आज त्यांच्या आठवणीत रममाण झाल्याचे दिसते आहे. दिवंगत विलासराव देशमुख यांची सून आणि अभिनेता रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम च्या अकॉउंट वरून तुम्ही आमचा अभिमान आहात असे म्हणत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत आपल्या मुलाचा एक किस्साही सांगितलं आहे.

जेनेलिया आणि रितेश यांचा मुलगा रिआन याच्या शिक्षिकेने त्याला विचारले की, तुला सगळ्यात जास्त अभिमान वाटणारे असे काय आहे? त्यावर त्याने सांगितले, “माझे आजोबा” हा किस्सा शेअर करत जेनेलिया ने देशमुख यांना आदरांजली वाहिली आहे. त्याचबरोबर त्या भावनिक झाल्या आणि “तुम्ही आमचा अभिमान अहात पपा, आम्ही रोज तुम्ही आजूबाजूला असल्याच्या जाणिवेत असतो आणि आम्हाला माहित आहे, तुम्ही जिथे असाल तिथून आमच्याकडे बघत असाल.” असे त्यांनी त्यांच्या पोस्टमधून म्हंटले आहे. त्या म्हणतात, तुम्ही आमच्यातच आहात आणि आम्ही दरदिवशी तुम्हाला साजरे करत असतो.

 

दिवंगत विलासराव देशमुख यांची कौटुंबिक एकता आपल्याला अनेकदा दिसून आली आहे. त्यांचे कुटुंबावर असणारे प्रेमही बऱ्याचदा त्यांनी उघडपणे व्यक्त केले आहे. रितेश देशमुख व जेनेलिया यांचे नातेही तितकेच उघड आहे. जेनेलिया तिच्या सासरच्यांनी लाडकी असल्याचेही दिसून आले आहे. रितेश प्रमाणे त्या देखील आपल्या सासऱ्यांसोबत भावनिकरीत्या जोडल्या गेल्या होत्या हे त्यांच्या पोस्टवरून दिसून येते. आज कोरोनामुळे सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून विलासराव देशमुख यांना अभिवादन केले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो आहे? असा सवाल त्यांनी या व्हिडिओत विचारला आहे. तसेच खुर्चीचा विचार नंतर करा आधी इकडे बघा असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आपले घर सोडून मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर का जावे लागते आहे असा सवालही कदम यांनी यावेळी केला आहे.

ते म्हणाले, ‘६१ दिवसांच्या संचारबंदीनंतर महाराष्ट्राच्या घराघरात उपासमार सुरु झाली आहे. मुंबईसारख्या शहरात रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत, रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णालयात बेड मिळत नाहीत म्हणून रुग्ण घरामध्ये मृत्यूमुखी पडत आहेत. रेशन चे मोफत अन्न अनेक ठिकाणी पोहोचलेले नाही आणि तुम्हाला खुर्चीच काय पडलंय?” या व्हिडिओत त्यांनी महाराष्ट्राच्या रेल्वेसंदर्भातील विषयाला हात घालून आमच्याकडे यादी तयार आहे म्हणता तर दोन दिवस निघून गेले तरी तुम्ही अजून यादी रेल्वे प्रशासनाला का दिली नाही? असा स्पष्ट प्रश्न विचारत तुम्ही का खोटे बोलला? असा टोमणा मारला.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपले घर सोडून मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी का जावे लागते आहे. आणि काँग्रेस चे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण स्वतः हे सरकार अपयशी आहे असं म्हणत असताना तुम्ही त्याचा विचार का करत नाही. केवळ सरकार स्थित आहे म्हणता आहात. सरकार आणि खुर्ची सोडा आणि या गंभीर परिस्थितीचा विचार करा असा सल्लाही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. मध्यंतरी आपल्या वादातीत विधानामुळे आमदार राम कदम चांगलेच चर्चेत आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.